डॉ. श्रीकांत कार्लेकर
ताज्या संशोधनाचे सह-लेखक डॉ. मॅथ्यू फॉक्स यांच्या म्हणण्यानुसार, माउंट एव्हरेस्ट आणि त्याच्या शेजारची शिखरे उंचावत आहेत, कारण संतुलन प्रतिस्कंद त्यांच्या जवळपासच्या प्रदेशाच्या झिजेच्या वेगापेक्षा जास्त वेगाने त्यांना वर ढकलत आहे. ही पर्वत उंचावण्याची क्रिया वर्षाला सुमारे दोन मिलिमीटर वेगाने सुरू आहे.
माउंट एव्हरेस्टच्या जवळच असलेले एका नदीचे पात्र पृथ्वीवरील या अत्युच्च शिखराला आणखी वर ढकलत आहे. या नदीच्या घळईची झीज होत असल्यामुळे होणाऱ्या उत्थापनामुळे गेल्या काही हजार वर्षांमध्ये एव्हरेस्टची उंची जवळपास १५ ते ५० मीटरने वाढली असून ती अजूनही वाढतेच आहे. लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजच्या संशोधकांनी केलेल्या ताज्या अभ्यासाचा हा निष्कर्ष आहे.
आजपर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीवरून माउंट एव्हरेस्टची उंची वाढत असल्याचे निश्चित संकेत मिळत होते. मात्र त्यामागच्या नेमक्या कारणाबाबत समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. एव्हरेस्टच्या उंचीत होणाऱ्या वाढीच्या कारणावर प्रकाश टाकणारा हा अभ्यास ३० सप्टेंबर २०२४ रोजी नेचर जिओसायन्समध्ये प्रकाशित झाला आहे.