नवा राजा अन् नवी राणी

गतवर्षी अमेरिकन ओपन आणि आता विम्बल्डनच्या हिरवळीवर बाजी मारत अल्काराझने पुरुष टेनिसमध्ये नवी पहाट उगवल्याचे सिद्ध केले आहे.
table tennis
table tennissakal
Updated on

टेनिस जगतात मानाची स्पर्धा असलेल्या विम्बल्डनला यंदा महिला आणि पुरुष एकेरीमध्ये नवीन विजेते गवसले आहेत. पुरुष एकेरीमध्ये महान टेनिसपटू नोवाक जोकोविचला हरविणाऱ्या स्पेनच्या कार्लोस अल्काराझच्या रूपात जागतिक टेनिसमध्ये नवा सितारा प्रकाशमान झाल्याची चर्चा सुरू झालीय.

तर, बिगरमानांकित असलेल्या मार्केटा व्होन्ड्रोसोवा आपल्या कारकिर्दीतले पहिले ग्रँड स्लॅम जिंकताना असा पराक्रम करणारी पहिलीच खेळाडू ठरली.टेनिस जगतातील महान टेनिसपटू सर्बियाचा नोवाक जोकोविचने कारकिर्दीतील पहिले एकेरी ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले, तेव्हा स्पेनमधील कार्लोस अल्काराझ या मुलाने पाचवा वाढदिवसही साजरा केला नव्हता.

स्पेनच्याच राफेल नदालने चौदापैकी आपले पहिले फ्रेंच ओपन जेतेपद प्राप्त केले, तेव्हा हा मुलगा फक्त दोन वर्षांचा होता. ३७ वर्षीय नदालची कारकीर्द अस्ताला आहे, तर ३६ वर्षीय जोकोविचही फार काळ टेनिस कोर्टवर कार्यरत राहण्याची शक्यता कमीच आहे.

आणखी एक दिग्गज, स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आधीच निवृत्त झालेला आहे. हे तीन महान खेळाडू टेनिसमधून बाहेर पडत असताना पोकळी निश्चितपणे जाणवेल, पण ती फार मोठी नसेल अशी सध्याची परिस्थिती आहे. कारण अल्काराझ या ऐन विशीतील टेनिसपटूचा खेळ पाहता, जागतिक टेनिसमध्ये नवा सितारा प्रकाशमान झाल्याची चर्चा सुरू झालीय.

गतवर्षी अमेरिकन ओपन आणि आता विम्बल्डनच्या हिरवळीवर बाजी मारत अल्काराझने पुरुष टेनिसमध्ये नवी पहाट उगवल्याचे सिद्ध केले आहे. गतवर्षी अमेरिकन ओपन जिंकून जागतिक प्रमुख क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले, तेव्हा अल्काराझ फक्त १९ वर्षांचा होता. अग्रस्थान मिळविणारा तो युवा टेनिसपटू ठरला.

table tennis
Nanded : चोरीच्या अडीच लाखाच्या आठ दुचाकी जप्त

पाच मे रोजी त्याने विसावा वाढदिवस साजरा केला. वर्षभरात दोन ग्रँडस्लॅम जिंकून अल्काराझने टेनिसमध्ये नव्या युगाची नांदी सुरू केली आहे. यंदा विम्बल्डनच्या हिरवळीवरील तो नवा राजा ठरला.

गेली सलग दोन वर्षे जोकोविचने या ठिकाणी बाजी मारली होती. यावेळी पहिला सेट जिंकून त्याने झोकात सुरुवात केली होती. मात्र नंतर टायब्रेकरवर दुसरा सेट जिंकलेल्या अल्काराझने भन्नाट खेळ केला. झंझावाती सर्व्ह, भेदक फोरहँड, बॅकहँड फटक्यांच्या बळावर या स्पॅनिश खेळाडूने दिग्गज प्रतिस्पर्ध्यास १-६, ७-६ (८-६), ६-१, ३-६, ६-४ असे पाच सेटमध्ये नामोहरम केले.

जोकोविचला सलग तिसऱ्या वर्षी विम्बल्डनमध्ये जल्लोष करणे शक्य झाले नाही. हा पराभव त्याच्या जिव्हारी लागला. जोकोविचने या वर्षी ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच ओपन जिंकताना खेळाचा दर्जा खूपच उंचावला होता.

ऑल इंग्लंड क्लबवरील स्पर्धेत जिंकला असता, तर काही विक्रम जोकोविचच्या नावे जमा झाले असते. त्याने रॉजर फेडररच्या आठ विम्बल्डन जेतेपदांना गाठले असते. जागतिक टेनिसमध्ये एकेरीत सर्वाधिक २४ ग्रँडस्लॅम पटकावणाऱ्या मार्गारेट कोर्टशी बरोबरी साधली असती.

सर्वाधिक ३५व्यांदा ग्रँडस्लॅम अंतिम लढत खेळताना हा सर्बियन खेळाडू पराभूत झाला. २०१३ साली त्याला विम्बल्डनमधील अंतिम लढतीत ब्रिटनच्या अँडी मरेने हरविले होते, त्यानंतर या हिरवळीवर त्याला २०१७ साली उपांत्यपूर्व फेरीत टोमास बर्डीच याच्याविरुद्ध माघार घ्यावी लागली होती आणि आता सोळा वर्षांनी लहान असलेला अल्काराझ त्याला वरचढ ठरला.

table tennis
Nanded: नदीपात्र ओलांडून गाठावे लागते शेत; ‘कयाधू’वर पुलाची मागणी दुर्लक्षित

परिपूर्ण, सर्वांगसुंदर खेळाडू

अल्काराझपूर्वी दोघाच स्पॅनिश टेनिसपटूंनी विम्बल्डनच्या हिरवळीवर विजयी पताका फडकावली होती. मॅन्युएल सांताना याने १९६६ साली, तर नदालने दोन वेळा (२००८ व २०१०) ऑल इंग्लंड क्लबची स्पर्धा जिंकली. फ्रेंच ओपनच्या उपांत्य लढतीत अल्काराझ व जोकोविच यांच्यात लढत झाली होती.

त्यावेळी सामना सुरू असताना अल्काराझच्या स्नायूंनी दगा दिला आणि जोकोविचला नमविणे त्याला जमले नाही. विम्बल्डनला अल्काराझने पहिला सेट गमावल्यानंतर जबरदस्त मुसंडी मारली. वर्षभराच्या कालावधीतील त्याचा खेळ पाहता, तो केवळ एकाच कोर्टवरील तज्ज्ञ नाही, तर माती, हिरवळ, हार्ड कोर्टवर सराईतपणे खेळताना दिसतो.

नव्या युगातील परिपूर्ण, सर्वांगसुंदर खेळ करणारा टेनिसपटू या लौकिकाच्या दिशेने त्याची सध्याची वाटचाल सुरू आहे. अंतिम लढत गमावल्यानंतर खुद्द जोकोविचनेच खुल्या दिलाने अल्काराझचे कौतुक केले. या युवा स्पॅनिश खेळाडूत फेडरर, नदाल आणि आपली सर्वोत्तम गुणवैशिष्ट्ये आहेत, असे तो म्हणाला.

जोकोविचच्या शब्दांत सांगायचे झाल्यास, ‘अल्काराझ वयाच्या मानाने खूपच परिपक्व आणि मानसिकदृष्ट्या कणखर आहे. त्याचा लढाऊ बाणा अफलातून आहे, तर बचावात्मक खेळही लाजवाब आहे.’ जोकोविचला अल्काराझ व नदाल यांच्यात काहीप्रमाणात साम्यही दिसते.

अल्काराझची बॅकहँड फटक्यांवर हुकमत आहे. विम्बल्डनच्या अंतिम लढतीत त्याने तुफानी खेळ केला. ताशी १३० मैल वेगाची सर्व्ह भन्नाट ठरली. जोकोविचप्रमाणे तो स्लायडिंग फटक्यांचा परिणामकारक वापर करतो.

मैदान कोणतेही असो, परिस्थितीनुरूप क्षमतेने खेळण्याचे कसब अल्काराझकडे आहे. त्यामुळेच लहान वयात तो जगातील सर्वोत्तम व अव्वल टेनिसपटू ठरला आहे. अजूनही तो फार मोठी मजल निश्चितच मारू शकतो, कारण वय आणि सर्वोत्तम कौशल्य त्याच्या बाजूने आहे.

table tennis
Nanded rain : पावसाळ्यातील ५० टक्के पाऊस अवघ्या सहा दिवसांत! अतिवृष्टीमुळे खरीप पिकांची दाणादाण

मार्केटा व्होन्ड्रोसोवाचा धडाका

अल्काराझ विम्बल्डनमध्ये पहिल्यांदाच विजेता ठरला, त्याच्या एक दिवस आधी याच हिरवळीवरील स्पर्धेत चेक प्रजासत्ताकाच्या मार्केटा व्होन्ड्रोसोवाने कारकिर्दीतील पहिलेच ग्रँडस्लॅम जिंकले.

बिगरमानांकित असूनही ती ट्युनिशियाच्या ओन्स जाबेरला वरचढ ठरली. असा पराक्रम करणारी व्होन्ड्रोसोवा पहिलीच बिगरमानांकित महिला टेनिसपटू ठरली. या डावखुऱ्या महिला खेळाडूची जिगर वाखाणण्याजोगी आहे. मनगटावर दोन शस्त्रक्रिया होऊनही ही २४ वर्षीय खेळाडू डगमगली नाही.

२०१९ साली तिने फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठली होती, पण अॅश बार्टीविरुद्ध तिला नमते घ्यावे लागले. त्यावर्षी तिच्या मनगटावर पहिली शस्त्रक्रिया झाली. नंतर सावरत आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये पाऊल टाकताना तिने टोकियोत २०२१ साली झालेल्या ऑलिंपिकमध्ये महिला एकेरीतील रौप्यपदक मिळविले.

गतवर्षी तिला पुन्हा एकदा मनगटावरील शस्त्रक्रियेसाठी इस्पितळात जावे लागले. डिसेंबरमध्ये पुनरागमन करत तिने २०२३ साली पात्रता मिळविली. मात्र ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तिसऱ्या फेरीत, तर फ्रेंच ओपनमध्ये दुसऱ्याच फेरीत गारद होणाऱ्या ४२व्या क्रमांकावरील व्होन्ड्रोसोवाकडे विम्बल्डन स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कोणाचेच लक्ष नव्हते.

व्होन्ड्रोसोवा ज्युनियर गटातील माजी अव्वल खेळाडू असली, तरी व्यावसायिक टेनिसमध्ये तिच्या कारकिर्दीला दुखापती ग्रासत होत्या. गतवर्षी ऑस्ट्रेलियन ओपननंतर ती बाकी तिन्ही ग्रँडस्लॅम स्पर्धा मनगटाच्या दुखापतीमुळे खेळू शकली नव्हती.

२०११ आणि २०१४ साली विम्बल्डन जिंकणारी पेट्रा क्विटोवा ही शेवटची चेक महिला खेळाडू होती. आता नऊ वर्षांनंतर या देशातील खेळाडू हिरवळीवर ग्रँडस्लॅम विजेती ठरली. मार्टिना नवरातिलोवाने विम्बल्डन स्पर्धा सर्वाधिक नऊ वेळा जिंकली आहे, ती अमेरिकन असली तरी तिचा जन्म तत्कालीन चेकोस्लोव्हाकियातील.

याशिवाय २०१७ साली निधन झालेली चेक प्रजासत्ताकाची याना नोवोत्नाने विम्बल्डन स्पर्धा १९९८ साली जिंकली होती. यंदा व्होन्ड्रोसोवाविरुद्ध पराभूत होणाऱ्या ओन्स जाबेरला नशिबाची साथ नव्हती. सलग दुसऱ्या वर्षी या २८ वर्षीय खेळाडूला विम्बल्डनच्या अंतिम लढतीत पराभवास सामोरे जावे लागले.

त्यामुळे या निकालाचे तिने कारकिर्दीतील सर्वांत वेदनादायक पराभव असे वर्णन केले. गतवर्षी तिला एलेना रिबाकिनाचा अडथळा पार करता आला नव्हता. गतवर्षी आणि यंदा कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळ करूनही जाबेरला अंतिम लढत जिंकण्याचे दिव्य पार करता आले नाही. गेल्यावर्षी अमेरिकन ओपनमध्येही ती उपविजेतीच ठरली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com