Women's Day :नोकरदार महिलांसोबतच घरकाम करणाऱ्या महिलांमध्ये 'या' आरोग्याच्या समस्या

संतुलित आहार, योग्य व्यायाम, योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा, कला, छंद जोपासणे, मित्रमैत्रिणींचा सहवास, खेळ, सहली, सिनेमा, नाटक, कौटुंबिक कार्यक्रम अशा सर्व स्तरांवर सहभागी होऊन स्वतःला आनंदी व समाधानी ठेवा...
homemaker health
homemaker health Esakal

मैत्रिणींनो, काम जरूर करा, आपल्या कुटुंबाचा व स्वतःचा उत्कर्ष जरूर करा. पण स्वतःकडे लक्ष द्या. संतुलित आहार, योग्य व्यायाम, योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा, कला, छंद जोपासणे, मित्रमैत्रिणींचा सहवास, खेळ, सहली, सिनेमा, नाटक, कौटुंबिक कार्यक्रम अशा सर्व स्तरांवर सहभागी होऊन स्वतःला आनंदी व समाधानी ठेवा.

डॉ. नेहा कुलकर्णी

शालिनी... एका शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी पोस्टवर काम करणारी, स्मार्ट, कर्तव्यतत्पर, हुशार... ती घर-संसार, मुले, त्यांचे शिक्षण, प्रगती, वयोवृद्ध सासू-सासरे, नवरा, अशी सर्वांची कामे करून ऑफिसमध्येदेखील चोख काम करणारी... स्वतःकडे बघायला मात्र अजिबात वेळ नाही.

रोजची धावपळ, दगदग, सततचा ताणतणाव! नोकरी-घर, संसार अशी तारेवरची कसरत करता करता एक दिवस ऑफिसमध्ये अचानक जोरदार चक्कर आणि दरदरून घाम फुटला, थोडासा दमही लागला. ऑफिसमधल्या सहकाऱ्यांनी जवळच्या दवाखान्यात नेले आणि तपासणीमध्ये हाय ब्लडप्रेशचे निदान झाले.

ही काहीशी घराघरातील कहाणी... प्रत्येक घरामध्ये नोकरदार स्त्रियांबाबत जवळपास सारखीच दिसणारी परिस्थिती आहे.

अलीकडच्या काळात बहुसंख्य महिला कारखान्यांमध्ये, पेट्रोलपंप कर्मचारी, शिक्षक, बस कंडक्टर, एसटी चालक, लोकल ट्रेनच्या चालक, वैमानिक, सफाई कामगार, अंगणवाडी सेविका, बँक कर्मचारी, डॉक्टर, नर्स, वकील, नाट्य व सिनेक्षेत्र, फायरमन, राजकारण अशा अनेकविध क्षेत्रात कार्यरत आहेत.

साधारण ६०-७० वर्षांपूर्वी मात्र ही परिस्थिती नव्हती. स्त्रिया बव्हंशी घरामध्ये असायच्या. अर्थातच घरामध्येही भरपूर कामे असत. अंगमेहनतीची कामे त्यातल्या त्यात जास्त. त्याकाळी यांत्रिकीकरण झाले नव्हते. त्यामुळे कपडे, भांडी, स्वच्छता, स्वयंपाक अशा विविध गोष्टी स्त्री स्वतः करत होती. तरी ताणतणाव कमी होते.

स्पर्धा, चुरस नव्हती. एकत्र कुटुंबपद्धती होती. त्यामुळे कामाचे विभाजन होते. आयुष्य समाधानी होते. पर्यायाने आजारपणही कमी होते. पण गेल्या काही दशकांत जागतिकीकरणामुळे जग जवळ आले. जीवनमान उंचावू लागले.

हातात जास्त पैसा येऊ लागला आणि मग अजून पुढे, अजून पुढे करता करता प्रचंड स्पर्धा, चुरस, अहमहमिका वाढली आणि अतिहव्यासापायी सुख, समाधान, आनंद लोपले. वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने स्त्रीला घराबाहेर पडावे लागले.

आता असे एकही क्षेत्र राहिले नाही, की ज्यात स्त्रिया काम करू शकत नाहीत. अगदी वैमानिकांपासून ते कारखान्यात शॉप फ्लोअरवर दहा-बारा तास स्त्रिया काम करू लागल्या आहेत.

आताच आपल्या देशाच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहिमेतील मुख्य शास्त्रज्ञही महिलाच होत्या. अलीकडेच वाचनात आले, की महापालिकेच्या अग्निशमन दलात फायरमन म्हणून प्रथमच महिला उमेदवाराची निवड झाली.

आता विविध नोकरी/व्यवसायांमध्ये कार्यरत झाल्यावर त्या-त्या नोकरी/व्यवसायांचा आरोग्यावर दुष्परिणाम होणार हे ओघाने आलेच. विविध नोकरी/व्यवसायांचा स्त्रियांच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम होतो तो असा...

आपल्या देशात जास्तीत जास्त महिला शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. शाळा, कॉलेज, विश्वविद्यालये येथे बहुतेक महिला शिक्षक दिवसातील आठ-दहा तास काम करतात. या व्यवसायात सर्वांत जास्त परिणाम होतो मानेच्या व कमरेच्या मणक्यांवर.

सतत मान वर करून फळ्यावर लिहिणे, खाली मान घालून लेखन करणे व पेपर तपासणे, उभे राहून शिकवणे या क्रियांमुळे सरव्हायकल स्पाँडिलायटिस, लंबर स्पाँडिलायटिस होतो. मान दुखणे, चक्कर येणे, कंबर दुखणे, हाताला मुंग्या येणे, हाताला बधिरपणा येणे अशी लक्षणे या आजारांत दिसतात.

दुसरा परिणाम म्हणजे, खडूच्या वापराने निर्माण होणाऱ्या धुळीमुळे सायनस, सर्दी, अॅलर्जिक खोकला, सततच्या शिंका असे त्रास सुरू होतात. सततच्या बोलण्याने स्वरयंत्रावर अतिरिक्त ताण येऊन सूज येते.

तिसरा महत्त्वपूर्ण परिणाम म्हणजे सतत उभे राहिल्याने व्हेरिकोज व्हेन्स व डीप व्हेन थॉम्बॉसिस म्हणजे पायातील नीला या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त साकळून गाठी निर्माण होतात.

पाय दुखणे, पोटऱ्यांचे स्नायू दुखणे, पायांवर नागमोडी रक्तवाहिन्यांचे जाळे निर्माण होऊन त्वचेला खाज सुटणे अशा अनेक व्याधी सुरू होतात.

आयटी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात महिला कार्यरत आहेत. या क्षेत्रात जसा आर्थिक फायदा जास्त आहे, तसे शारीरिक व मानसिक तणावदेखील जास्त आहेत.

सतत लॅपटॅपवर काम केल्याने डोळ्यांच्या व्याधी उद्‍भवतात, उदाहरणार्थ- लांबचा चष्मा लागणे, दृष्टिदोष, डोळे कोरडे होणे (Dry Eye Syndrome) वगैरे. मानेच्या मणक्यांचे विकार, पायांच्या सांध्यांवर परिणाम होणे अशाही काही समस्या जाणवू लागतात.

तासनतास ऑफिसात एसीमध्ये बसल्याने अॅलर्जिक सायनस व सर्दीचे विकार, व्हिटॅमिन ‘डी’ची कमरता आणि महत्त्वाचे म्हणजे सततच्या बैठ्या कामामुळे स्थूलता व त्यामुळे बीपी, डायबेटीस, आणि प्रसंगी पीसीओडी, कॅन्सरसारख्या आजारांनासुद्धा निमंत्रण मिळू शकते.

काही महिला वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असतात. डॉक्टर व परिचारिकांचे आयुष्य हे रुग्णांच्या सेवेसाठी वाहून घेतलेले असते. त्यामुळे कामाची अशी ठरावीक वेळही नसते.

वेळीअवेळी आलेले कॉल आणि प्रचंड टेन्शनचे काम यामुळे साहजिकच आहाराकडे, व्यायामाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे महिला वैद्यकीय व्यावसायिकांचे आर्युमानही आजकाल कमी होताना दिसते.

बीपी, डायबेटिस, हृदयरोग, पीसीओडी, कॅन्सर, मानसिक आजार असे विविध आजार, महिला डॉक्टर व परिचारिकांमध्ये दिसून येतात. या क्षेत्रातील महिला काहीवेळा कुटुंबाला वेळ देऊ शकत नाहीत.

आपल्या देशात व्यावसायिक महिलांपैकी एक मोठा वर्ग घरकाम करतो. सतत वाकून आणि पाण्यात काम करत राहिल्याने कंबर, मान, पाठीची दुखणी, सर्दी-खोकला, पायाच्या बोटांमध्ये फंगल इन्फेक्शन असे त्रास होतात.

अपुरा आहार व पोषणमूल्यांची कमतरता यामुळे सतत अशक्तपणा असतो. वेळेअभावी म्हणा, पैशांअभावी म्हणा, पण आरोग्याची योग्य काळजी घेतली जात नाही. बरेचसे आजार अंगावर काढले जातात.

उदाहरणार्थ, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर लक्षणे दिसत असतात, पण ती कॅन्सरची लक्षणे आहेत हेच न कळल्यामुळे आणि योग्य वेळी उपचार न घेतल्याने आजार बळावतात.

आजकाल वकिली क्षेत्रातही भरपूर महिला आहेत. त्यांची या कोर्टातून त्या कोर्टात अशी धावपळ तर सुरूच असते. पण त्याशिवाय सततच्या बोलण्याने स्वरयंत्रावर ताण येतो आणि ताणतणावामुळे उद्‍भवणाऱ्या आजारांचाही त्यांना सामना करावा लागतो.

homemaker health
International Women's Day : स्त्रीचे स्वातंत्र्य फक्त नोकरी आणि कपड्यांपुरते नाही तर त्याचा आवाका खूप मोठा...

स्त्रीच्या कामाची वैशिष्ट्ये सर्वत्र दिसतात, ती वैशिष्ट्ये म्हणजे प्रामाणिकपणा, सचोटी, निष्ठा, सर्व कौशल्य पणाला लावून स्वतःपेक्षा कामाला दिलेले प्राधान्य! पण यामुळे नकळत स्वतःकडे दुर्लक्ष होते आणि काम करता करता स्त्रीचे शरीर कमकुवत होऊ लागते.

त्यात मासिक धर्म हा करिअरच्या शिखरापर्यंत सुरू असतो. त्याचाही काही त्रास सहन करावा लागतो. व्यावसायिक महिला ही तारेवरची कसरत अखंड करीत असतात.

जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने आवर्जून सांगावेसे वाटते, मैत्रिणींनो, काम जरूर करा, आपल्या कुटुंबाचा व स्वतःचा उत्कर्ष जरूर करा.

पण स्वतःकडे लक्ष द्या. संतुलित आहार, योग्य व्यायाम, योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा, कला, छंद जोपासणे, मित्रमैत्रिणींचा सहवास, खेळ, सहली, सिनेमा, नाटक, कौटुंबिक कार्यक्रम अशा सर्व स्तरांवर सहभागी होऊन स्वतःला आनंदी व समाधानी ठेवा.

वैयक्तिक शारीरिक तपासण्या नियमितपणे करा. योग्य औषधोपचार घ्या. कुटुंबावर प्रेम करताच, थोडे स्वतःवरदेखील करा... मस्त जगा... आनंदी जगा...!

जागतिक महिलादिनाच्या तुम्हा सर्वांना भरभरून शुभेच्छा!

--------------

homemaker health
International Women's Day 2024 : अन्नप्रक्रिया उद्योजिका घडविणारी ‘मसाला क्वीन’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com