
प्रा. युगांक गोयल
महाराष्ट्रातील शिक्षणगळतीच्या प्रमाणाचा अभ्यास केला तर उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण स्तरावर गळतीचे प्रमाण जास्त दिसत आहे. शाळा सोडणारे प्रत्येक मूल ही केवळ देशाने गमावलेली संधी नसून समाजासाठी मूक इशाराच असतो.
गळती रोखण्यासाठी अवलंबलेल्या धोरणांमुळे अल्पकालीन दिलासा दृष्टिपथात आला असला, तरी विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी आणि भविष्यकालीन संधींवरील त्यांची संभाव्य दीर्घकालीन प्रभावाची पाहणी बाकी आहे.
शिक्षण हा केवळ घटनात्मक हक्क नाही तर तो सामाजिक अभिसरण, आर्थिक प्रगती आणि सामाजिक कल्याणाचा पाया आहे. साक्षरतेचे महत्त्वाचे टप्पे गाठल्याचा डंका वाजत असताना, गाजावाजा-मथळे होत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांचे शाळा सोडणे, शाळा गळतीची प्रक्रिया मूकपणे होत आहे. त्याकडे संबंधित यंत्रणेचे होत असलेले सोयीस्कर दुर्लक्ष सामाजिक असामनता अधोरेखित करते.