
SCO summit
esakal
शांघाय सहकार्य परिषदेच्या चीनमधील बैठकीतून अमेरिकेच्या दादागिरीला वैतागलेल्या आणि ती झुगारून देऊ इच्छिणाऱ्यांचं एकत्र येणं अधोरेखित होत असतानाच यातील कोणालाही अमेरिकेशी थेट संघर्ष नको आहे. जमेल तितकं सहकार्य हवं आहे. याचंही दर्शन घडतं. अमेरिकेचं ताजं टॅरिफ युद्ध हे चीन, रशिया आणि भारत यांना एकाच मंचावर आणण्यात तातडीचं कारण बनलं. या तीनही देशांना जागतिक रचना बदलायची आहे, मात्र ती कशी असावी, यावरचे दृष्टिकोन निराळे आहेत.
तूर्त ट्रम्प यांच्या टॅरिफ कृपेनं सारे एका सुरात बोलायचा प्रयत्न करताहेत, मात्र नव्या रचनेत अमेरिकेची जागा घेण्याची चीनची महत्त्वाकांक्षा भारताला मान्य होण्यासारखी नाही, रशियाला पचनी पडण्यासारखी नाही. चीननं या निमित्तानं आपली राजनैतिक ताकद दाखवलीच पण त्याचवेळी आपल्या लष्करी सामर्थ्याचं प्रदर्शन केलं, ज्याची जगानं दखल घेतली. भारताबरोबरच्या मैत्रीला ट्रम्प यांनी धक्का दिला तर शी जिनपिंग यांनी दोस्तीचा हात पुढं करताना चीनची मूळ भूमिका बदलत नाही. तेव्हा चीनवर किती कसा विश्वास ठेवायचा, हा पेच संपत नाही. ‘एससीओ’मधील यशाच्या आणि भारत-चीन जवळ आल्याने अमेरिकेला कापरं भरल्याच्या कथा पसरवण्यातून वास्तवातला पेच मात्र संपत नाही.