

Maoist Surrender
eSakal
भारताच्या दंडकारण्यातील राज्यांमध्ये रक्ताचा सडा शिंपणारे माओवादी आता शरणपंथाला लागले आहेत. महाराष्ट्रात मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती आणि छत्तीसगडमध्ये रूपेशसारख्या वरिष्ठ जहाल माओवाद्यांनी पत्करलेली शरणागती, माओवाद्यांच्या सर्वोच्च केंद्रीय समितीतील समाविष्ट करण्यात आलेला पहिला आदिवासी, अनेक मोठ्या हल्ल्यांचा मास्टरमाइंड आणि जिवंतपणीच 'जंगलातील भूत' या नावानं दंतकथा बनलेला जहाल माओवादी माडवी हिडमाचं सुरक्षा यंत्रणांकडून सहज मारलं जाणं, यातून माओवाद्यांकडे मृत्यू किंवा शरणागती या दोन पर्यायांपैकी एकच निवडण्याची मुभा आहे, हे वास्तव ठळक झालं.माओवाद्यांच्या महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड (एमएमसी) झोनमधील स्पेशल झोनल कमिटी सदस्य आणि प्रवक्ता अनंत उर्फ विकास (खरे नाव विनोद सायन्ना उर्फ भास्कर) हा दहा सहकाऱ्यांसह नुकताच गोंदिया पोलिसांना शरण आला. शरणागतीसाठी तयार असल्याचं सांगणारी दोन पत्रकं त्यानं काढली.