

Shivaji Maharaj Swarajya expansion 1656
esakal
१६४९ची फतहखान व १६५९ची अफजलखान या दोन स्वाऱ्यांबाबत जास्त चर्चा होते. यामधील दहा वर्षांच्या काळात शिवाजीराजांनी स्वराज्याच्या सक्षमीकरणाकडे लक्ष दिले. १६५७च्या कोकण मोहिमेपूर्वी त्यांनी आपल्या राज्याची घडी नीट बसविली, सैन्य सुसज्ज केले, शस्त्रनिर्मिती केली, महसूल व न्यायव्यवस्था सुदृढ केली. शत्रूची कोणतीही कुरापत न काढता अंतर्गत सामर्थ्य वाढविले व प्रजेचा विश्वास संपादन केला. त्यानंतरच ते स्वराज्यविस्ताराच्या सीमोल्लंघनास बाहेर पडले.
फतहखानाविरुद्धची १६४९ची लढाई पुरंदरावरून झाली होती. त्यावेळी महादाजी निळकंठराव या आदिलशाही किल्लेदाराकडून हा किल्ला राजांनी आपल्या ताब्यात घेतला होता. आदिलशाहाने तंबी दिल्यावर तो पुन्हा त्यांच्याकडे देण्यात आला. महादाजींचे एप्रिल १६५४च्या दरम्यान निधन होऊन त्यांच्या मुलांमध्ये वाद होऊ लागल्याने, राजांनी बाबाजी नाईक पुंडे यांना पाठवून किल्ल्याचा पूर्णतः ताबा घेतला. नेतोजी पालकर यांस किल्लेदार म्हणून नेमून सहकुटुंब तिथे वास्तव्यास गेले. पुढे १४ मे १६५७ रोजी युवराज संभाजीराजांचा जन्म येथे झाला.
कोकणातील कल्याण बंदराहून देशाकडे येणारा ‘नाणेघाट’ हा प्राचीन व्यापारी मार्ग आणि येथील ‘जुन्नर’ ही संपन्न बाजारपेठ पूर्वी निजामशाहीच्या, पर्यायाने शहाजीराजांच्या प्रभावाखाली होती. पुढे या भागावर मुघलांचा ताबा आला. जानेवारी १६५६मध्ये, त्यावेळी शिवाजीराजांच्या ताब्यातील चाकणच्या उत्तर सीमेवरील भीमा नदीपासून ६० कि.मी. अंतरावर असणाऱ्या जुन्नरवर शिवरायांनी छापे घातले व महसूल मिळविला.