

Shivaji Maharaj Karnataka Campaign
esakal
आदिलशाहीतील यादवीचा फायदा घेत आणि मुघलांशी तह करून राजांनी स्वराज्याच्या सीमा सुरक्षित केल्या. शत्रूची रसद तोडणे व दक्षिणेत अभेद्य तळ उभारण्याच्या उद्देशाने ६ ऑक्टोबर १६७६ रोजी दक्षिण दिग्विजयासाठी प्रस्थान केले. वाई, खटाव जिंकत आणि यालगेदलाच्या युद्धात हुसेनखानाला कैद करत शिवसैन्य पुढे गेले. ‘हेतूच्या गुप्तते’ने शत्रूला चक्रावून सोडत राजांनी भागानगरात शाही प्रवेश केला आणि कुत्बशाहाशी मैत्रीचा तह साधून, खजिना व रसदेसह कर्नाटक मोहिमेसाठी कूच केले.
विजयनगर साम्राज्याच्या विघटनानंतर १६५४ पर्यंत ‘वेलोर/वेल्लोर’ ही त्यांची राजधानी होती. तर जिंजी, बंगळूर, तंजावर, मदुरा, म्हैसूर इत्यादी ठिकाणचे नायक हे त्यांचे मांडलिक होते. आदिलशाहीने १६३६ ते १६४४ दरम्यान शिरे, बंगळूर आदी तर १६४९मध्ये जिंजीचे राज्य गिळंकृत केले. अखेर १६५४मध्ये विजयनगर सम्राट श्रीरंग रायलु याच्याकडून वेलोरही जिंकून घेतले. या जिंकलेल्या कर्नाटक प्रांताची दोन प्रमुख विभागांत विभागणी केली. उत्तरेकडील भागावर जिंजी येथून नासिर मुहम्मद (दख्खनी गटनेता खवासखानाचा भाऊ) याचे तर दक्षिणेकडील भागावर वलिकंडापुरम येथून शेरखान लोदी (पठाणी गटप्रमुख बहलोलखानाचा विश्वासू) याचे नियंत्रण होते. तसेच याच्या पश्चिमेकडील ‘बंगळूर’ प्रांत शाहजीराजे व त्यांच्या निधनानंतर एकोजी/व्यंकोजी यांच्याकडे जहागीर म्हणून होता. याशिवाय तंजावर, मदुरा, म्हैसूर, इक्केरी इ. प्रांतातील नायक स्वतंत्र असले, तरीही आदिलशाहीला नियमितपणे खंडणी देत होते. अशातच शिवाजीराजांचे सावत्र बंधू एकोजींनी १६७५मध्ये ‘तंजावर’ येथे स्वतंत्र सत्ता प्रस्थापित केली. पुढे आदिलशाही दरबारात दख्खनी व पठाणी गटांत जीवघेणा संघर्ष पेटताच, सप्टेंबर १६७६मध्ये शेरखानाने नासिर मुहम्मदाच्या प्रांतावर आक्रमण केले. जिंजी प्रांत पठाणी गटापेक्षा कुत्बशाहीला दिलेला बरा, या विचाराने नासीरने कुत्बशाहीशी वाटाघाटी सुरू केल्या.
दख्खनच्या परिस्थितीची अचूक जाण असलेल्या राजांनी डिसेंबर १६७५च्या पूर्वीपासूनच या मोहिमेची तयारी सुरू केली होती. आपण सह्याद्री व पश्चिम किनारपट्टीवर जी भूमिका बजावत आहोत, तशीच पूरक भूमिका एकोजींनी तिथे बजावावी, अशी राजांना अपेक्षा होती. यासाठी एकोजींच्या दरबारातील ‘रघुनाथ व जनार्दन नारायण’ यांच्याशी राजांनी संवाद वाढवला. त्यांनी राजांचे विचार एकोजींना हरप्रकारे सांगूनही ते न पटल्याने त्यांच्यात बिनसले आणि फेब्रुवारी १६७६ पूर्वी ते कुटुंबीयांसह स्वराज्यात आले.
रघुनाथपंत व हेरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे राजांनी मोहिमेची योजना आखली. तत्पूर्वी आदिलशाह व मुघलांचा धोका दूर करून स्वराज्याच्या सीमा सुरक्षित करणे आवश्यक होते. त्यासाठी राजांनी जुलै १६७६च्या सुमारास आदिलशाहीशी तह केला; परंतु तो टिकला नाही. अखेर सप्टेंबर १६७६च्या सुमारास राजांनी मुघलांशी तह केला आणि आदिलशाहीविरुद्धच्या युद्धासाठी आपले ४ हजार घोडेस्वार मुघलांच्या मदतीला पाठवले. यामुळे मुघल व आदिलशाहीत तीव्र संघर्ष पेटला. अशा रीतीने राजांनी मुत्सद्देगिरीने मुघलांना आदिलशाहीविरुद्ध युद्धास प्रवृत्त करून दोन्ही अडथळे दूर केले. आता मोहिमेसाठी आवश्यक तोफा व अवजड युद्धसाहित्यासाठी राजांनी कुत्बशाहीकडे मदत मागितली. राजकारणाचा वारा येईल तसे मुत्सद्देगिरीचे ‘शीडं’ फिरवण्यात तरबेज असलेल्या राजांनी मोहिमेपूर्वीच मुघल, आदिलशाही व कुत्बशाही या तिन्ही दरबारांचे राजकारण आपल्या बाजूने वळवून घेतले.