सिंधुदुर्गाच्या पाऊलखुणा - संस्थानच्या चलनात रुपयाचा प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गाच्या पाऊलखुणा - संस्थानच्या चलनात रुपयाचा प्रवेश

}

ब्रिटीशांनी कारभार हातात घेतल्यानंतर मुख्य बदल अर्थव्यवस्थेत केले. कारभाराला शिस्त लावताना अनावश्यक खर्च बंद केले. याबरोबरच चलनातही बदल केला. पूर्वी विविध प्रकारची नाणी चलनात प्रचलीत होती. ती बंद करून १८४८ मध्ये कंपनी नाणे अर्थात रुपया चलनात आणला. सैन्याच्या रचनेतही मोठे बदल केले.

सिंधुदुर्गाच्या पाऊलखुणा - संस्थानच्या चलनात रुपयाचा प्रवेश

कोणत्याही मुलखात अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार येथील चलन व्यवस्था असते. सावंतवाडी संस्थानच्या चलन व्यवस्थेत अनेक राज्यकर्त्यांच्या चलनांचा प्रभाव दिसतो. १६७९च्या दरम्यान करी दाभोळी या नावाचे एक नाणे चालू असल्याचे उल्लेख आढळतात. चार करी दाभोळी म्हणजे एक पिरखानी रुपया होत असे. याशिवाय होन हे नाणे विशेष प्रचारात होते.

सावंत भोसले घराण्याच्या भरभराटीच्या काळात अरवीस, बेळ, दुवल आदी विविध नाणी प्रचारात होती. त्या काळात सर्वात लहान नाणे म्हणजे अरवीस. दोन अरवीस म्हणजे एक वीस, दोन वीस म्हणजे एक बेळ, दोन बेळ म्हणजे एक दुवल, दोन दुवल म्हणजे एक चवल, दोन चवल म्हणजे एक धरण, दोन धरण म्हणजे एक प्रताप, दोन प्रताप म्हणजे एक होन किंवा वराय अशी त्या काळातील पैशांची मोजणी किंवा मुल्यमापन असायचे. यात होन किंवा वराय हे सोन्याचे नाणे होते. त्यावर वराहाचे चित्र असायचे. वराह हे चालुक्यांचे राजचिन्ह होते. त्यावरून हे नाणे चालुक्य काळापासून चलनात असावे असे मानले जाते. हे नाणे अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत चालू होते. सरकारी हिशोबात याचाच उपयोग होत असे.

हेही वाचा: अगुंबे : दक्षिण भारताची ‘चेरापुंजी’

पिरखानी रुपया हेही एक लोकप्रिय नाणे होते. पिरखान नावाचा एक सुभेदार भिमगड परगण्यात होता. त्याने हे नाणे पाडले होते. यावरूनच याचे नाव पडले. एक होन म्हणजे दोन पिरखानी रुपये आणि दोन आणे असे याचे मुल्य होते. पुढे या नाण्याचा प्रचार वाढला. सरकारी हिशोबातही त्याचा वापर सुरू झाला. या काळात रुपया, अधेला व पावला ही रुप्याची नाणीही चलनात होती. याशिवाय संस्थानात विविध तांब्याची नाणीही चलनात वापरली जात असत. यात गावसुरती, कंपनी, शंभू, मुडे सुरती, राजे बहादरी, शहापुरी, मीरजी, मकरशाही, नवारी, पुणेशिक्का, दोब्राव, पनाळी, बेलापुरी, तांग या नाण्यांचा समावेश होता. या नाण्यांचा भाव पिरखानी रुपयाशी तुलना करून ठरत असे.

बाजारातील इतर वस्तुंप्रमाणे या नाण्यांचे मुल्यही कमीजास्त होत असे. याशिवाय छत्रपती, दुराडी, बाणकोटी ही नाणीही चालू होती. ९ जुलै १८३४ ला सावंतवाडी सरकारने ही तिन्ही नाणी चलनातून बंद केली. ही नाणी ज्यांच्याकडे होती त्यांना ती टाकसाळीतून बदलून देण्याची व्यवस्था केली. त्या ऐवजी राजे बहाद्दर शिक्क्याचे पैसे देण्यात आले. एकूणच त्या काळात चलनामध्ये विविधता होती. ब्रिटीशांनी १८४८ मध्ये यात बदल करून कंपनीचे नाणे अर्थात ब्रिटीशांचे चलन सुरू केले. हा अर्थव्यवस्थेतील बदलाचा महत्त्वाचा टप्पा होता.

सैन्य व्यवस्थेतही ब्रिटीशांनी बरेच बदल केले. त्या काळात कारभार चालवताना सैन्यावर मोठा खर्च होत असे. सावंतवाडी संस्थानमध्ये लखम सावंतांच्या काळात मोठे सैन्य होते. त्या काळात १२ हजार पायदळ असल्याचा उल्लेख आढळतो. पुढे फोंडसावंत उर्फ आनासाहेब यांच्या कारकीर्दीत फारशी युध्दजन्य स्थिती नव्हती. त्यामुळे सैन्यसंख्याही कमी करण्यात आली. पुन्हा रामचंद्र सावंत आणि जयराम सावंत यांच्याकाळात साम्राज्य विस्ताराचे प्रयत्न झाले. यामुळे सैन्यही वाढवण्यात आले. जयराम सावंत यांनी बार्देस प्रांतावर स्वारी केली तेव्हा त्यांच्यासोबत बावीसशे घोडेस्वार होते.

हेही वाचा: माय टूर : शानदार पॅलेस इस्टेट, पाक सिमेवरील लखपतचा नजरा

कुडाळात आंग्य्रांबरोबर झालेल्या लढाईत सावंतांसोबत १२ हजार पायदळ, नऊशे घोडेस्वार, तिनशे सरदार आणि प्रत्येकाचे सैन्य होते. पुढे खेम सावंत यांच्या कारकीर्दीत सैन्याची संख्या थोडी कमी करण्यात आली. तरीही त्यांच्याकडे लहान-मोठी दीडशे पथके होती. त्यात एकूण ७,५६७ शिपाई होते. यात पथक प्रमुख असलेल्या रघुनाथ दळवींकडे २५०, सावंत २,०१६, सबनीस ९०२, सिदसावंत भोसले १५०, अनंत फट शेणवी ९०, नार सावंत पेंडुरकर १५६, गणोजी घाट १५८, नाईक साटम २४७, भिरवडेकर व नाटलेकर १४४, रघु फर्जंद १७८, दत्ताजी प्रभू सातार्डेकर १२०, मसुरकर २२५ अशा सैन्याच्या विभागणीचा समावेश होता. सावंत व सबनीस यांच्या हाताखाली आणखी लहान मोठी पथके होती. या सर्व सैन्याचा वार्षिक खर्च ५०,८१२ होन अर्थात ९२,७३२ रुपये होता. प्रत्येक सैनिकाला वर्षाला सरासरी सव्वा बारा रुपये मिळत असत. पुढे हा खर्च कमी कमी केला गेला. सैन्याची संख्याही कमी करण्यात आली. शिवाय सैनिक ठेवण्याच्या रचनेतही बदल झाले. पुर्णवेळ सैनिक ठेवण्याची संकल्पना बंद करण्यात आली. चौथ्या खेमसावंतांच्या कारकीर्दीपर्यंत तो २५,८१७ रुपयापर्यंत खाली आला.

या काळात शिपायांना त्यांच्या शेतातून मिळणाऱ्या धान्याच्या रकमेतील करातून रक्कम वजा करून मोबदला द्यायची पध्दत होती. याला शेतसनदी नेमणूक म्हणत. या लोकांना कायम शिपाई म्हणून नोकरीला रहावे लागत नसे. लढाईचा प्रसंग पडेल त्यावेळी त्यांना बोलावले जाईल. यामुळे कमी खर्चात जास्त सैन्य ठेवणे सावंतवाडीकरांना शक्य होई. त्याकाळात सैनिकांसाठी कवायत, प्रशिक्षण आदीची व्यवस्था नव्हती. लढाईच्या काळात या लोकांना मोबदला अर्थात मुशाहिऱ्या बरोबरच अडेसरी म्हणजे रोजची पोटगी वेगळी दिली जात असे. ती रोज एका व्यक्तीला कुडाळी मापाने तीनशेर भात इतकी मिळे. लढाईत शहीद झालेल्या शिपायांच्या मुलांच्या उदरनिर्वाहासाठी ‘बाळप्रवेशी’ म्हणून ठरावीक नेमणूक किंवा रक्कम दिली जात असे. ती दरवर्षी बारा पासून चौवीस रूपयांपर्यंत असायची. काहीवेळा निर्वाहासाठी जमीनही इनाम दिली जायची. शिवाय लढाईत जखमी किंवा अपंग झालेल्या शिपायांना निर्वाहासाठी नेमणूक देण्याची पद्धत होती. ब्रिटिशांनी सत्ता हातात घेतल्यानंतर यातही मोठे बदल केले.

हेही वाचा: सिंंधुदुर्गच्या पाऊलखुणा : 'सावंतवाडी' गेले ब्रिटिशांच्या हाती

आरमार रचना

सावंतवाडी संस्थानकडे आरमार असल्याचे उल्लेख आधी आले आहेतच. या आरमारात गुराबा आणि गलबते असायची. गुराबा ही दोन ढोलकाठ्यांची दीडशे ते तीनशे टन वजनाची असायची. याचा तळ पाण्यात खोल जात नसल्याने वाऱ्याबरोबर ती वेगाने चालत असे. परदेशातून येणाऱ्या ओबडधोबड मोठ्या व्यापारी गलबतांवर चपळाईने हल्ला करण्यासाठी याचा वापर होत असे. गलबते ही गुराबाहून थोडी लहान असायची. सावंतवाडीच्या आरमारात लक्ष्मीप्रसाद, भवानीप्रसाद व साहेबसदर ही तीन गुराबे आणि रामबाण, रघुनाथ, दुर्गा, यशवंती, लक्ष्मी, हनुमंत अशी सहा गलबते होती. त्यावर ३३१ लढावू सैनिक व २०६ दर्यावर्दी मिळून ५३७ जण असायचे. याचा वार्षिक खर्च २७१३ रुपये होता. १८१२ मध्येच हे आरमार ब्रिटीशांनी ताब्यात घेतले होते. यामुळे प्रत्यक्ष ब्रिटिशांचा अमल सुरू झाला तेव्हा आरमारात पुर्नरचनेचा प्रश्‍न आला नाही.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
टॅग्स :SindhudurgIndia