
इटलीचा २३ वर्षीय स्टार टेनिसपटू यानिक सिनर व पोलंडची २४ वर्षीय इगा स्विअतेक यांनी यंदा अनुक्रमे विम्बल्डन ग्रँडस्लॅम पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन विभागांत जेतेपदावर मोहर उमटवली. या दोन्ही खेळाडूंचे विजेतेपद स्पेशल ठरले. मागील काही काळ दोघांसाठीही खडतर ठरला. डोपिंग अर्थातच उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत सापडल्यामुळे दोघांनाही शिक्षेला सामोरे जावे लागले. शिक्षेचा कालावधीत मोठा नसला तरी जागतिक स्तरावर नाचक्की झाल्यामुळे मानसिकतेला धक्का पोहोचतो हे तेवढेच खरे आहे. निराशेच्या गर्तेतून बाहेर येत सिनर व स्विअतेक या दोघांनीही हिरवळीच्या कोर्टवर वर्चस्व प्रस्थापित केले, ही बाब उल्लेखनीय आहे.
स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर, स्पेनचा राफेल नदाल हे महान टेनिसपटू कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात होते. सर्बीयाचा नोवाक जोकोविच हा अव्वल दर्जाचा खेळ करीत होता. अशातच स्पेनचा कार्लोस अल्काराझ व इटलीचा यानिक सिनर हे युवा खेळाडू नावारूपाला येत होते. अल्काराझ याने २०२२मध्ये अमेरिकन ओपन या ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरले आणि तेथूनच टेनिस या खेळामध्ये नव्या युगाला प्रारंभ झाला. अल्काराझ याने आतापर्यंत पाच ग्रँडस्लॅम जेतेपदावर हक्क सांगितला असून, सिनर याने चार ग्रँडस्लॅम विजेतेपदाची माळ आपल्या गळ्यात घातली आहे. अल्काराझ याला ऑस्ट्रेलियन ओपन या ग्रँडस्लॅममध्ये यश मिळवता आलेले नाही. सिनर याला फ्रेंच ओपन जेतेपदाने हुलकावणी दिलेली आहे. अल्काराझ याने तर पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्यपदकही पटकावले आहे. एकूणच काय तर पुरुष एकेरी विभागात अल्काराझ व सिनर यांचे नाणे खणखणीत वाजत आहे.