
Insurance Investment Plan
esakal
सर्व गुंतवणूकदारांचे एक स्वप्न असते, ते म्हणजे शेअर बाजार खालच्या पातळीवर असताना खरेदी करायची आणि उच्चांकावर पोहोचल्यावर विक्री करायची. ऐकायला हे जितके सोपे वाटते, तितके ते वास्तवात घडणे कठीण असते. कारण बाजाराची दिशा नेहमीच अनिश्चित असते आणि व्यवहाराचा योग्य वेळ साधणे म्हणजे जणू सुईच्या टोकावर नृत्य करण्यासारखे अत्यंत कठीण. याच स्थितीला ‘गुंतवणुकीचा पेच’ म्हणतात. हा पेच सोडविण्यासाठी ‘सिसो’ धोरण आणि त्यातील प्रमुख घटक असलेला आयुर्विमा मोलाची भूमिका बजावतो.
बहुतांश वेळा शेअर बाजारातील अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदार बाजार खाली असताना भावनेच्या आहारी जाऊन विक्री करतात आणि नुकसान करून घेतात. जिथे खरेदीची संधी आहे, तिथे विक्री करून नुकसान झाल्याने शेअर बाजारापासून दूर होतात आणि संधीचे एक दार बंद करतात. शिस्तबद्ध गुंतवणुकीचे महत्त्व माहिती असूनही भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होते. या समस्येवर उपाय म्हणजे एक अशी प्रणाली तयार करणे, जी अंदाज आणि भावनांवर अवलंबून न राहता शिस्तबद्ध निर्णय घेण्यास मदत करते.