

India West Asia Relations
esakal
मयूरेश प्रभुणे - saptarang@esakal.com
अवकाशात रॉकेट प्रक्षेपित करणारी स्कायरूट ही एकमेव भारतीय कंपनी नाही. आयआयटी मद्रासमध्ये स्थापन झालेल्या अग्निकुल कॉसमॉस या कंपनीच्या पुनर्वापरयोग्य स्वदेशी रॉकेटचेही लवकरच चाचणी उड्डाण अपेक्षित आहे. याआधी अग्निकुलनेदेखील ''अग्निबाण'' या रॉकेटची वातावरणातील चाचणी यशस्वी केली आहे. अवकाश क्षेत्र खुले झाल्यानंतर गेल्या सहा वर्षांत ४०० स्टार्टअप कंपन्यांनी सरकारकडे नोंदणी केली आहे.
स्कायरूट या भारतीय खासगी कंपनीच्या ''विक्रम १'' या रॉकेटने १८ जुलै रोजी चार छोट्या उपग्रहांना पृथ्वीभोवती ४५० किलोमीटरच्या कक्षेत सोडून इतिहास घडवला. पहिल्याच प्रयत्नात अवकाशात उपग्रह प्रक्षेपित करणारी स्कायरूट ही जगातील पहिली कंपनी ठरली. या उड्डाणासोबत खासगी कंपनीकडे रॉकेट प्रक्षेपणाची क्षमता असलेला अमेरिका, चीननंतर भारत जगातील तिसरा देश ठरला आहे. योगायोग असा, की डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली १८ जुलै १९८० ला ''एसएलव्ही ३'' या भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) पहिल्या रॉकेटचे यशस्वी उड्डाण झाले होते. ४६ वर्षांनी त्याच तारखेला ''विक्रम १'' या स्कायरूट कंपनीच्या रॉकेटने यशस्वी उड्डाण करीत भारतीय अवकाश कार्यक्रमाच्या नव्या अध्यायाची सुरुवात केली.