

Digital Public Opinion
esakal
डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी - shripad bhalchandra@gmail.com
समूह माध्यमे हीच या पुढे आपले अस्तित्व, आपली विशिष्ट भाषिक, सांस्कृतिक ओळख टिकविण्याच्या चळवळींसोबतच व्यापक सांस्कृतिक, वाङ्मयीन, सामाजिक जीवनाची विवेकी व्यासपीठेही ठरणार आहेत. सांस्कृतिक वैविध्य, बहुभाषिकता, बहुधार्मिकता यांच्या संवर्धनासाठी हीच समूह माध्यमे वापरली जाणार आहेत.
समूह माध्यमांची ताकद काय असते, याचे प्रत्यंतर ६ जून रोजी दिल्लीतील जंतरमंतरवर ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या माध्यमातून झालेल्या तरुणांच्या आंदोलनातून पुन्हा एकदा आले. या आंदोलनाची प्रेरणा सर्वोच्च न्यायालयातील एका न्यायमूर्तींच्या टिप्पणीतील ‘झुरळ’ या रूपकातून मिळाली. खरे तर ती त्यांनी कोणत्या संदर्भात केली होती, हे स्पष्ट केले असले तरी त्यातलेच झुरळ हे रूपक घेऊन समूह माध्यमातून ‘काॅक्रोच जनता पार्टी’ नाव, प्रवर्तक तरुणाचे प्रभावी अन् चमत्कृतीजन्य निवेदन आणि जोडीला झुरळाचे तोंड असलेल्या सुटाबुटातील युवकाचे बोधचिन्ह घेऊन चळवळ उभी झाली ती समूह माध्यमावर. म्हणजे समाजात बदल, परिवर्तन आणि त्यासाठीची समूह मनस्कता याचे त्वरित प्रतिबिंब आज जर कुठे उमटत असेल तर ते समूह माध्यमांमध्येच.
पारंपरिक माध्यमांची स्पर्धा आता या समूह माध्यमांशी आहे. कारण एवढ्या तातडीने अन्य कोणत्याही माध्यमातून अभिव्यक्त होता येणे, त्वरित प्रतिक्रिया देता येणे किंवा मत व्यक्त करता येणे शक्य नाही. अवघ्या चार दिवसांतच या चळवळीला दोन कोटी अनुयायी मिळाले. ही संख्या सर्वाधिक अनुयायी असणाऱ्या भाजप पक्षालाही मागे टाकणारी ठरली. ही ताकद मुळात जनतेची नसून ती समूह माध्यमाची आहे. त्याचे पुढे लोकशक्तीमध्ये किती रूपांतर होते, तो भाग वेगळा. लोकांना चटकन भावणाऱ्या अशा काही घटना घडताच ही ताकद वारंवार प्रत्ययास आलेली आहे.