

South Korea Economic Growth
esakal
भरत फाटक - bharat@wealthmanagers.co.in
गेल्या दोन वर्षांमध्ये दक्षिण कोरियातील शेअर बाजाराने नेत्रदीपक परतावा दिला आहे. त्या तुलनेत भारतीय शेअर बाजारांची कामगिरी लक्षवेधक नसल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतातील पैसे काढून कोरियाकडे वळविले. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत कोरियाने जपानलाही मागे टाकले आहे. दक्षिण कोरियाने १९६१ पासून आजपर्यंतच्या ६५ वर्षांत आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीची लक्षणीय घोडदौड कशी केली, त्यामागचे घटक कोणते आणि त्यापासून आपण काय धडा घेऊ शकतो, याचा घेतलेला हा वेध...
गेल्या दोन वर्षांमध्ये दक्षिण कोरियातील शेअर बाजाराने नेत्रदीपक परतावा दिला आहे. ‘एमएससीआय कोरिया’ निर्देशांकाने २०२५ मध्ये ९९ टक्के, तर २०२६ च्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये ९८ टक्के परतावा दिल्यामुळे गुंतवणूकदार अचानक कोरियाकडे वळले आहेत. याच दोन कालावधीत भारतीय शेअर बाजारातील परतावा अमेरिकी डॉलरमध्ये अनुक्रमे २.६२ टक्के आणि उणे १४.९४ टक्के असल्यामुळे ही तफावत अधिक प्रकर्षाने जाणवली आहे. मात्र, २००८ च्या सबप्राइम संकटानंतर एखाद्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदाराने या दोन्ही देशांमध्ये १०० डॉलर गुंतविले असते, तर २०२४ अखेरीस भारतातील गुंतवणुकीचे मूल्य ५३४ डॉलरवर पोहोचले असते; पण कोरियातील गुंतवणुकीचे मूल्य २५१ डॉलरवरच राहिले असते. गेल्या दोन वर्षांमध्ये ‘एआय’मधील झंझावातामुळे सेमीकंडक्टर मेमरी चिपची मागणी प्रचंड वाढली आणि कोरियातील सॅमसंग व एस. के. हायनिक्स या कंपन्यांचे उखळ पांढरे झाले. गेल्या १२ महिन्यांमध्ये सॅमसंगचा नफा १०० अब्ज डॉलर, तर ‘एस. के. हायनिक्स’चा नफा ५१ अब्ज डॉलरवर पोहोचला. त्या तुलनेत भारतातील ‘निफ्टी ५०’ निर्देशांकातील सर्व कंपन्यांचा एकत्रित नफा या एकेका कंपनीच्या नफ्यापेक्षा कमी होता. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतातील पैसे काढून कोरियाकडे वळविले, यात नवल वाटण्यासारखे काहीच नाही. ‘एमएससीआय इमर्जिंग मार्केट’ निर्देशांकातील भारताचे प्रमाण गेल्या दोन वर्षांमध्ये २१ टक्क्यांवरून ११ टक्क्यांवर घसरले, तर कोरियाचे प्रमाण ११ टक्क्यांवरून २१ टक्क्यांच्या घरात पोहोचले. अर्थातच, प्रस्तुत लेखाचा उद्देश गेल्या दोन वर्षांतील शेअर बाजारातील परताव्याची चर्चा करणे हा नसून, १९६१ पासून आजपर्यंतच्या ६५ वर्षांत दक्षिण कोरियाने आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीची लक्षणीय घोडदौड कशी केली, त्यामागचे घटक कोणते आणि त्यापासून आपण काय धडा घेऊ शकतो, हे समजून घेणे हा आहे.