

Stock Market Correction
esakal
एस. नरेन
शेअर बाजारातील प्रत्येक घसरणीमागे वेगवेगळी कारणे असतात. त्यामुळे बाजाराचा अंदाज बांधण्यापेक्षा योग्य मालमत्ता वाटप, विविधीकरण आणि परताव्याबाबत वास्तववादी अपेक्षा ठेवणे महत्त्वाचे आहे. स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंडांमधील वाढता गुंतवणूक ओघ असो किंवा कच्च्या तेलाच्या किमतींमधील अस्थिरता, गुंतवणूकदारांनी केवळ लोकप्रिय गुंतवणूक पर्यायांच्या मागे न लागता आपल्या आर्थिक उद्दिष्टांनुसार निर्णय घ्यायला हवेत. बाजारातील घसरणीच्या काळात ‘एसआयपी’ सुरू ठेवावी का, एकरकमी गुंतवणूक कशी करावी आणि सध्याच्या परिस्थितीत कोणत्या प्रकारच्या फंडांचा विचार करावा, आदी विविध मुद्द्यांवर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचे कार्यकारी संचालक एस. नरेन यांची ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार वसंत कुलकर्णी यांनी ‘सकाळ मनी’साठी घेतलेली खास मुलाखत.
प्रश्न : तुम्ही तुमच्या कारकिर्दीत बाजाराची अनेक आवर्तने पाहिली आहेत. २००८, २०२० आणि २०२२ मधील घसरणींच्या तुलनेत सध्याच्या बाजाराकडे तुम्ही कसे पाहता?
नरेन : प्रत्येक बाजार आवर्तनाची स्वतःची वैशिष्ट्ये असतात. त्यामुळे इतिहासाची तंतोतंत पुनरावृत्ती होईल, असे गृहीत धरण्याऐवजी बाजारातील घसरणीमागील नेमकी कारणे समजून घेणे महत्त्वाचे असते. २००८ मधील जागतिक आर्थिक संकट हे प्रामुख्याने वित्तीय प्रणालीतील संकट होते. त्यातून बँकिंग व्यवस्थेतील अतिरिक्त कर्जबाजारीपणा आणि कमकुवतपणा उघड झाला. २०२० मधील घसरण कोविड महासाथीमुळे झाली. हा एक अभूतपूर्व बाह्य धक्का होता. त्यावर उपाय म्हणून रिझर्व्ह बँकेसह विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनी व्याजदर कमी केले आणि रोकडसुलभता वाढवली. २०२२ मधील घसरणीमागे वाढती महागाई, वाढते व्याजदर आणि वित्तीय मालमत्तांच्या मूल्यांकनातील बदल ही कारणे होती. सध्याच्या घसरणीमागे भू-राजकीय तणाव, कच्च्या तेलाच्या अस्थिर किमती, अमेरिकेतील वाढलेले व्याजदर आणि जागतिक शेअरच्या मूल्यांकनाबाबतची अनिश्चितता अशी अनेक कारणे आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) आलेल्या तेजीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा आणि उद्योग क्षेत्रांच्या कामगिरीतही लक्षणीय बदल होत आहेत. कंपन्यांच्या नफ्यात अपेक्षित वाढ न होणे, हेही घसरणीमागील एक कारण असू शकते. भारतात देशांतर्गत गुंतवणुकीच्या ओघाने, विशेषतः ‘एसआयपी’च्या माध्यमातून, घसरत्या बाजाराला आधार दिला आहे. मात्र, सातत्याने गुंतवणूक होत राहते म्हणजे परताव्याची हमी मिळते, असे नाही. अखेरीस कंपन्यांचे मूल्यांकन आणि त्यांची कमाई हेच महत्त्वाचे ठरतात. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी बाजाराची पुढील दिशा काय असेल, याचा अंदाज बांधण्यावरच लक्ष केंद्रित करू नये. बाजारातील वेगवेगळ्या परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी आपला पोर्टफोलिओ कितपत सक्षम आहे, याचा विचार करावा. आमचे गुंतवणूक तत्त्वज्ञान मालमत्ता वाटप (ॲसेट ॲलोकेशन), लवचीक गुंतवणूक (अनकन्स्ट्रेंट इन्व्हेस्टिंग) आणि माफक परताव्याची अपेक्षा (मॉडरेट रिटर्न) या तीन सूत्रांवर आधारित आहे. मालमत्ता वाटपामुळे केवळ शेअरवर अवलंबून न राहता मौल्यवान धातू, वस्तू आणि रोखे यांसारख्या अन्य मालमत्ता वर्गांतही गुंतवणूक करून विविधीकरण करता येते. लवचीक गुंतवणुकीमुळे फंड व्यवस्थापकांना विशिष्ट बाजार भांडवल गटापुरते किंवा ग्रोथ आणि व्हॅल्यू यांसारख्या विशिष्ट गुंतवणूक शैलीपुरते मर्यादित न राहता संधी शोधण्याचे स्वातंत्र्य मिळते. शेअर गुंतवणुकीत अशी लवचीकता मिळवण्याचा फ्लेक्सी कॅप फंड हा एक मार्ग आहे. परताव्याबाबत वास्तववादी अपेक्षा ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. बाजाराच्या एखाद्या विशिष्ट टप्प्यात मिळालेला अपवादात्मक परतावा भविष्यातही अनिश्चित काळापर्यंत मिळत राहील, असे गृहीत धरू नये. गुंतवणूकदारांनी शिस्तबद्ध पद्धतीने मालमत्ता वाटप करावे आणि बाजारातील अल्पकालीन चढ-उतारांवरून दीर्घकालीन गुंतवणुकीचे निर्णय घेऊ नयेत.