

Superstar Vijay Political Victory
esakal
किशोर अर्जुन - kishor.opera@gmail.com
सुपरस्टार जोसेफ विजय चंद्रशेखर यांना तमिळ मक्कलने कमालीचा विश्वास टाकत तमिळनाडूच्या सत्तेच्या सोपानापर्यंत नेऊन ठेवले आहे. पडद्यावरील ‘एकट्याने सगळे बदलणारा नायक’ आणि लोकशाहीतील सामूहिक निर्णयप्रक्रिया यांच्यामध्ये मूलभूत फरक असतो. विजय स्वतःला पडद्यावरील ‘दलपती’ मानसिकतेतून बाहेर काढून लोकशाहीतून नेतृत्व करू इच्छिणारे ‘लोकनायकन’ बनू शकतील का, हा खरा प्रश्न आहे.
केरळम, पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी आणि तमिळनाडू राज्यांतील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. आसाम, पुद्दुचेरी आणि काही प्रमाणात केरळमचा अपवाद वगळता अन्य दोन्ही राज्यांनी अत्यंत अनपेक्षित असा निकाल देत सगळ्याच गृहितकांना धक्का दिला आहे. त्यातही तमिळनाडूचा निकाल अनेक अंगांनी चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. कारण, तो फक्त तमिळनाडूच्या राजकीय इतिहासात सत्तांतर घडवताना दिसत नाहीत; तर तमिळ समाजाच्या बदलत्या मानसिकतेची जाहीर नोंद घ्यायला लावत आहेत. ‘हो-नाही-हो’ असे म्हणत तमिळ सिनेसृष्टीचा सुपरस्टार ‘दलपती’ विजय अर्थात जोसेफ विजय चंद्रशेखर यांनी अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ पक्षावर (टीव्हीके) तमिळ मक्कलने कमालीचा विश्वास टाकत तब्बल १०८ आमदार निवडून दिले आहेत आणि सत्तेच्या सोपानापर्यंत नेऊन ठेवले आहे. त्याचबरोबर गेल्या अर्ध शतकापासून तमिळनाडूच्या जनमानसावर आणि अर्थातच राजकारणावर अधिराज्य गाजवणाऱ्या द्रविड द्विपक्षीय व्यवस्थेच्या स्थैर्यालाच मोठे आव्हान दिलेले आहे.