Standard Costing
esakal
प्रतीक डुंबरे - capsdumbre@gmail.com
ते नाली रामन - मध्ययुगीन इतिहासातील एक बुद्धिमान, मिस्कील आणि हजरजबाबी व्यक्तिमत्त्व! आजच्या एकविसाव्या शतकातील एका काल्पनिक साम्राज्यातील हा तेनाली आपल्या महाराजांशी संवाद साधत व्यवसायातील काही महत्त्वाची रहस्ये उलगडतो. ‘तेनाली व्हॅल्यू फ्रेमवर्क’च्या माध्यमातून स्टॅंडर्ड कॉस्टिंग आणि व्हरायन्स ॲनालिसिस या संकल्पना गणपतीच्या मूर्ती घडविणाऱ्या छोट्या व्यवसायाच्या उदाहरणातून सोप्या पद्धतीने समजून घेऊ या...
साम्राज्यात गणेशोत्सवाची चाहूल लागली होती. काही दुकानांमध्ये सजावटीचे सामान आले होते. मंडळांचे पदाधिकारी मूर्तींच्या शोधात फिरू लागले होते आणि शहराच्या एका कोपऱ्यात, पिढ्यान्पिढ्या गणपतीच्या मूर्ती बनवणाऱ्या बाजारपेठेत सकाळपासून लगबग सुरू झाली होती. महाराज आणि तेनाली त्या बाजारपेठेत पाहणी करत चालले होते. त्यांचे लक्ष एका छोट्याशा कारखान्याकडे गेले. तिथे मिस्टर सुबकराव आपल्या जादुई हातांनी गणरायाची मूर्ती घडवत होते. त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह होता आणि ओठांवर मोहम्मद रफी यांचे गाणे होते, ‘‘देवा हो देवा गणपती देवा, तुमसे बढ़कर कौन?’’ महाराज आणि तेनाली त्या कारखान्यात गेले. मिस्टर सुबकरावांनी दोघांचे कौतुकाने स्वागत केले आणि त्यांना आपला छोटासा कारखाना दाखवू लागले. माती मळली जात होती. मूर्तींना आकार दिला जात होता. काही मूर्तींचे बारकाईने काम सुरू होते. काहींवर रंगकाम सुरू होते. तर काही मूर्ती ग्राहकांच्या नावासह बाजूला ठेवलेल्या होत्या. हा छोटेखानी कारखाना होता. चार-पाच जणांची टीम होती. कोणतेही ‘ईआरपी’ नव्हते. कोणतीही कॉस्टिंग यंत्रणा नव्हती. एक वही होती, एक कॅल्क्युलेटर होते आणि अनेक वर्षांचा अनुभव होता.
महाराजांनी सुबकरावांना विचारले,
‘‘सुबकराव, यंदा तर तुमचा सीझन चांगला दिसतोय. ऑर्डर्स कशा आहेत?’’
सुबकराव म्हणाले, ‘‘महाराज, ऑर्डर्स चांगल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहेत. मला मूर्ती घडवण्यात विलक्षण आनंद मिळतो. त्यामुळे कितीही काम केले तरी थकवा जाणवत नाही. काम करणारे सगळे कर्मचारीसुद्धा मेहनती आहेत. सगळे बारकावे शिकत राहतात. त्यामुळे जास्त त्रास होत नाही. पण एक अडचण आहे.’’
‘‘काय?’’
‘‘सीझन संपला की मनात प्रश्न येतो... इतक्या मूर्ती विकूनही पैसे कुठे गेले?’’
महाराजांनी आश्चर्याने तेनालीकडे पाहिले. तेनालीने सुबकरावांकडे पाहत विचारले,
‘‘तुम्हाला एका मूर्तीची कॉस्ट माहीत आहे?’’
‘‘हो.’’
‘‘किती?’’
सुबकरावांनी लगेच उत्तर दिले,
‘‘साइझ आणि डिझाइनवर अवलंबून असते. साधारण दीड ते...’’
तेनाली त्यांना थांबवत म्हणाला,
‘‘मी ‘साधारण’ विचारले नव्हते. मी विचारले, ‘नेमकी’ कॉस्ट माहीत आहे का?’’
सुबकराव गप्प झाले.
‘‘नाही. नेमकी माहीत नाही.’’
तेनाली म्हणाला, ‘‘मग तुमची समस्या ‘पैसे कुठे गेले?’ ही नाही. तुमची समस्या आहे- तुम्हाला तुमच्या कॉस्टमधला व्हरायन्स दिसत नाही.’’
महाराजांनी विचारले, ‘‘पण हा छोटा व्यवसाय आहे. एवढे सगळे कॉस्टिंग वगैरे करणे आवश्यक आहे का?’’
तेनाली हसला. ‘‘महाराज, मोठ्या व्यवसायाला कॉस्टिंगची गरज असतेच; पण छोट्या व्यवसायाला ती कदाचित त्याहून जास्त असते. कारण मोठ्या व्यवसायाला चूक भरून काढण्यासाठी साधने आणि संसाधने असतात; छोट्या व्यावसायिकाचे ५० हजार रुपयांचे लीकेज थेट त्याच्या घरच्या पैशावर परिणाम करते.’’
आणि तेनालीने सुबकरावांना एक वेगळा प्रश्न विचारला.
‘‘तुम्ही तुमच्या मूर्तीची कॉस्ट अंदाजाने ठरवता की मानकाने?’’
सुबकरावांनी विचारले,
‘‘मानक म्हणजे?’’
तेनाली म्हणाला,
‘‘आजपासून आपण तुमच्या व्यवसायात स्टॅंडर्ड कॉस्टिंग आणि व्हरायन्स ॲनालिसिस वापरू.’’
सुबकराव लगेच म्हणाले,
‘‘माझ्या व्यवसायासाठी स्टॅंडर्ड कॉस्ट कोण ठरवणार? दुसऱ्या मूर्तिकाराची मूर्ती आणि माझी मूर्ती सारखी नसते.’’
तेनाली हसला.
‘‘अगदी बरोबर. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगणार नाही, की २.५ फूट मूर्तीला किती किलो माती लागली पाहिजे. आपण तुमच्या स्वतःच्या कामातून स्टॅंडर्ड शोधू.’’
सुबकराव आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले.
तेनालीने समजावले,
‘‘स्टॅंडर्ड कॉस्टिंग म्हणजे एखादी मूर्ती योग्य पद्धतीने, अपेक्षित गुणवत्तेत तयार करण्यासाठी साधारण किती मटेरियल, लेबर आणि इतर संसाधने लागायला हवीत, याचा आधीच ठरवलेला बेंचमार्क. हा बेंचमार्क तुमच्या अनुभवावर, मागील डेटावर, चांगल्या बॅचेसवर आणि प्रत्यक्ष प्रक्रियेवर आधारित असावा. म्हणजे मागील अनुभव- चांगली प्रत्यक्ष कामगिरी- साध्य करण्याजोगे स्टॅंडर्ड- प्रत्यक्षाशी तुलना, फरकाचे कारण- सुधारणा- ही पूर्ण सायकल.
महाराज म्हणाले, ‘‘तेनाली, स्टॅंडर्ड कॉस्टिंग तर खूप सोप्या पद्धतीने समजले. पण या छोट्याशा कारखान्यात आपण त्याचा वापर करू शकू?’’
तेनाली म्हणाला, ‘‘नक्कीच महाराज.’’
सुबकरावांकडे पाहत तो म्हणाला, ‘‘मागच्या सीझनमध्ये तुम्ही कोणत्या आकाराच्या मूर्ती सर्वाधिक विकल्या?’’
‘‘२ फूट, २.५ फूट आणि ३ फूट,’’ सुबकराव म्हणाले.
‘‘त्यापैकी एखादी कॅटेगरी घेऊ,’’ तेनालीने सांगितले.
‘‘२.५ फूट.’’
‘‘मागच्या सीझनमध्ये चांगल्या पद्धतीने तयार झालेल्या २.५ फूट मूर्तींच्या काही बॅचेसचे रेकॉर्ड आहेत का?’’
सुबकरावांनी वही काढली. काही आकडे होते. काही पानांवर सप्लायरच्या बिलांच्या चिठ्ठ्या होत्या. काही ठिकाणी कारागिरांची नावे होती. कुठे ग्राहकाच्या ॲडव्हान्सची नोंद होती, तर कुठे फक्त ‘२० मूर्ती पूर्ण’ असे लिहिले होते.
तेनाली म्हणाला, ‘‘हाच तुमचा डेटा आहे. परफेक्ट नसला तरी सुरुवात करण्यासाठी हे पुरेसे आहे.’’
त्याने मागील सीझनमधील तुलनेने चांगल्या प्रॉडक्शन बॅचेसचा अभ्यास केला आणि एका २.५ फूट मातीच्या मूर्तीसाठी एक निदर्शक मानक म्हणजेच स्टॅंडर्ड तयार केले.