

Aravalli Mountain Range
esakal
निसर्ग विरुद्ध सरकार असा महाराष्ट्राच्या ‘तपोवना’तील संघर्ष ताजा असतानाच तिकडे अरवली पर्वतरांगांवरूनही केंद्रातील मोदी सरकारला पर्यावरणवाद्यांनी घेरले आहे. या पर्वतरांगांमधील अधिक टेकड्या, डोंगर खाणकामासाठी खुले करण्याचा छुपा हेतू असल्याचा आरोप होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने अरवली पर्वतरांगांची अधिकृत व्याख्या मंजूर केल्यानंतर जगातील सर्वांत जुन्या पर्वतरांगांपैकी एक असलेल्या या पर्वतरांगांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. ‘अरवली’वरून सुरू असलेला हा वाद नक्की काय आहे, त्याचा वेध...
‘अरवली’ पर्वतरांग जगातील सर्वांत प्राचीन पर्वतरांगांपैकी एक असून, ती अंदाजे ७०० किलोमीटरपर्यंत पसरली आहे. थर वाळवंटातून येणारा वाळू अन् धुळीचा मारा रोखण्यासाठी नैसर्गिक कवच म्हणून अनेक शतके ती अभेद्य भिंत म्हणून काम करत आली आहे. तिने अनेक राज्यांमध्ये भूजल पुनर्भरण; तसेच समृद्ध जैवविविधता टिकवून ठेवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. अरवली याचा अर्थ ‘शिखरांची रांग’ असा आहे. अरवलीची उंची सामान्यतः ७६० ते १,०६० मीटर इतकी आहे; पण जोधपूर व जयपूर यांच्यामधल्या रांगांची उंची ४५७ मीटरपेक्षा कमी आहे. अरवलीमध्ये अनेक शिखरे आढळत असून त्यांची रुंदी १० ते १०० किलोमीटर आहे आणि उंची सामान्यपणे ३०० ते ९०० मीटर आहे. अरवलीचा अजमेरपासून अबूच्या पहाडापर्यंतचा भाग सर्वांत जाड व रुंद असून त्या भागातल्या रांगा ठळक व सलग आहेत. अरवलीच्या पश्चिमेस थरचे वाळवंट आहे. नैर्ऋत्य वाऱ्यांबरोबर जाणारी त्याची वाळू साचून ईशान्येस असलेल्या रांगांचा पुष्कळसा भाग झाकला गेला आहे. रांगांचे सखल भाग वाळूखाली पुरले गेले असून, केवळ त्यांचे उंच भाग उघडे राहिले आहेत. ‘माउंट अबू’च्या नैर्ऋत्येस असलेल्या भागांकडे जाऊ लागले म्हणजे तेथील रांगा अधिक लहान व विरळ होत गेलेल्या आढळतात. अखेरीस सिरोहीच्या नैर्ऋत्य भागात त्यांचा शेवट होतो. आजच्या अरवलीचे उत्तरेकडील टोक दिल्लीजवळ व दक्षिणेकडील टोक गुजरातेत आहे; पण पूर्वी तो नैर्ऋत्य व ईशान्य अशा दोन्ही दिशांस, बराच दूरवर, उत्तर प्रदेशातल्या हिमालयातील गढवालपर्यंत पसरला असावा असा इतिहास सांगतो. अरवलीच्या रांगांचे, लहान उंचवट्यांच्या स्वरूपात असणारे, काही भाग सौराष्ट्रात (काठेवाडात) आणि कच्छमध्ये आढळतात. त्यावरून अरवलीच्या रांगा तेथपर्यंत गेल्या असाव्या. एवढेच नव्हे, तर त्याच्याही पुढे त्या गेल्या असाव्यात, असे म्हटले जाते. ‘अरवली’चा इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे या पर्वतरांगा आता नव्या कारणांनी चर्चेत आहेत.