

Business Correspondent Sakhi Project
esakal
प्राची गावस्कर-prachi.gawaskar@gmail.com
महाराष्ट्रात आर्थिक सर्वसमावेशन वाढविण्याच्या उद्देशाने वुमेन्स वर्ल्ड बँकिंगच्या सहकार्याने बिझनेस करस्पॉंडंट सखी अर्थात ‘बीसी सखी’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जात आहे. यातून महिलांना आर्थिक उत्पन्न मिळत असून, आर्थिक सेवांचा दुर्गम भागातही विस्तार झाला आहे. या उपक्रमाबाबत वुमेन्स वर्ल्ड बँकिंगच्या दक्षिण आशिया विभागाच्या प्रादेशिक प्रमुख कल्पना अजयन यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न : आर्थिक सर्वसमावेशनाच्या दृष्टीने वुमेन्स वर्ल्ड बँकिंगच्या सहकार्याने महाराष्ट्रात ‘बीसी सखी’ हा महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवला जात आहे. यामधील ‘बीसी सखी’ म्हणून काम करणाऱ्या महिलांच्या भूमिकेबद्दल काय सांगाल?
कल्पना : भारत सरकारने २०१९ मध्ये ‘एक ग्रामपंचायत एक बीसी सखी’ अशी संकल्पना मांडली होती. महिला बचत गट आणि महिला बँकिंग एजंट यांची साखळी निर्माण करून ग्रामीण भागात वित्तपुरवठा वाढवणे आणि उद्योजकतेला चालना देणे, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा याचा मुख्य उद्देश होता. त्यानुसार, महाराष्ट्रातही ‘उमेद’ (UMED - Maharashtra State Rural Livelihoods Mission) अभियानाच्या माध्यमातून वुमेन्स वर्ल्ड बँकिंगच्या सहकार्याने या अभिनव उपक्रमाची सुरुवात झाली. यातील मुख्य घटक असलेल्या ‘बीसी सखी’ ग्रामीण आर्थिक सर्वसमावेशनाचा कणा आहेत. त्या विश्वास, सुलभता आणि वैयक्तिक पाठबळ देऊन लाखो कुटुंबांना मुख्य प्रवाहातील बँकिंगशी जोडतात. ग्रामीण भागातील महिला त्यांच्या ओळखीच्या महिला एजंटकडे आपले फोन नंबर आणि आर्थिक माहिती विश्वासाने देतात. आज ग्रामीण भारतात ७५,००० पेक्षा जास्त सखी कार्यरत आहेत, ज्या शेवटच्या घटकापर्यंत आर्थिक सेवा पोहोचवण्याचे काम करत आहेत. पंतप्रधान जनधन योजनेच्या यशातही त्यांचा मोठा वाटा आहे. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या काळात, मोठ्या प्रमाणावर आर्थिक समावेशन करण्यासाठी डिजिटल आणि प्रत्यक्ष उपस्थिती यांचे मिश्रण आवश्यक आहे. ते या महिलांनी यशस्वीरित्या प्रत्यक्षात आणण्यास मदत केली आहे. त्यामुळे आम्ही या ‘बीसी सखीं’ना ‘सामाजिक पायाभूत सुविधा’ (Social Infrastructure) म्हणतो.