

Kerala Political Alliances LDF UDF BJP
esakal
केरळमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी डाव्या आघाडीचा मोठा पराभव झाला आहे. तिरुअनंतपुरममध्ये भाजपने विजय मिळवीत, केरळच्या राजकारणातील तिसरा पक्ष म्हणून स्वतःचे स्थान मजबूत केले आहे. दुसऱ्या बाजूला डाव्या आघाडीच्या कारभाराविरोधात जनतेमध्ये तीव्र नाराजी असून, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूडीएफ’ला त्याचा मोठा फायदा झाला.
केरळमध्ये ‘कमळ फुलावे’ यासाठी भाजपकडून अनेक वर्षांपासून प्रयत्न होत होते. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिरुअनंतपुरम महापालिकेमध्ये मिळालेल्या यशामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात येताना दिसत आहे. आता मे महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका भाजपच्या डोळ्यासमोर आहेत. त्यामुळेच स्वतः तिरुअनंतपुरमला येऊन शहरासाठी मॉडेल विकास प्रकल्पांची घोषणा करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांना सांगितले आहे. अहमदाबादमध्ये १९८७मध्ये पहिल्यांदा भाजपचा महापौर झाला होता आणि त्यानंतर भाजपने गुजरातची सत्ता मिळविली होती. त्याप्रमाणेच केरळमध्येही पुढील निवडणुकीच्या दृष्टीने भाजपची तयारी सुरू आहे, हेच यातून दिसून येते. केरळच्या निकालाविषयी भाजपचे नेतृत्व प्रचंड उत्सुक होते. मोदी यांनी ‘एक्स’वर या निकालाविषयी चार वेळा पोस्ट केल्या, तर अमित शहा, राजनाथसिंह, नितीन गडकरी, जे. पी. नड्डा या केंद्रीय मंत्र्यांनीही राजीव चंद्रशेखर यांचे अभिनंदन करताना समाजमाध्यमांवरून त्यांचे अभिनंदनही केले.