

Devagiri Fort History
esakal
छत्रपती संभाजीनगरपासून सुमारे १७ किलोमीटर अंतरावर असलेला यादवांनी बांधलेला देवगिरी किल्ला अजिंक्य आणि अभेद्य आहे. किल्ल्याचे बांधकाम हे स्थापत्यशास्त्राचे अनमोल असे उदाहरण आहे. लढाई करून देवगिरी किल्ला जिंकणे कोणत्याही सत्ताधीशाला अशक्यप्राय होते. फंदफितुरीशिवाय देवगिरी जिंकणे दुरापास्तच होते. याची कल्पना शत्रूलादेखील होती, इतके या दुर्गाचे बांधकाम अद्वितीय आहे.
दक्षिण भारतात विशेषतः महाराष्ट्रात यादवांनी सुमारे ४५० वर्षे राज्य केले. त्यातील सुमारे १३० वर्षे त्यांची राजधानी ‘देवगिरी’ गडावर होती. तत्कालीन विशेषतः मध्ययुगीन भारताच्या राजकीय घडामोडीचे ‘देवगिरी’ हे अत्यंत महत्त्वाचे केंद्र होते. देवगिरी हा भारतीय इतिहासातील महत्त्वपूर्ण किल्ला आहे. त्याचे बांधकाम हे स्थापत्यशास्त्राचे अनमोल असे उदाहरण आहे. त्याबाबत शिवकालीन चरित्रकार कृष्णाजी अनंत सभासद म्हणतात, की ‘देवगिरी हा किल्ला रायगडाच्या तुलनेत उंचीने कमी असला तरी पृथ्वीवरील उत्तम आणि दुर्गम दुर्ग आहे.’ ‘दुर्गम दुर्ग देवगिरी हा पृथ्वीवरील चखोट गड खरा; परंतु तो उंचीने थोडका’ असे वर्णन देवगिरीबाबत सभासदांनी केलेले आहे. यादव राजा दृढप्रहार सेऊनचंद्र, भिल्लम, वेसुगी, एरमदेव, मलुगी, जैतुगी, सिंघण, कृष्णदेवराय, महादेवराय, रामदेवराय, शंकरदेव, हरपालदेव इत्यादी राजांनी सुमारे ४५० वर्षे दक्षिण भारतावर राज्य केले. त्यातील यादव राजा भिल्लम (पाचवा) याने सुमारे ११८७ ला एका शंखाकृती पर्वतावर ‘देवगिरी’ किल्ल्याच्या बांधकामास प्रारंभ केला. हे बांधकाम २० वर्षे चालले. देवगिरी किल्ल्यावर यादव राजा भिल्लम (पाचवा) याने यादव साम्राज्याची राजधानी स्थापन केली. सुवर्ण गरुडध्वज हे यादव राजसत्तेचे निशाण होते. यादव राजा सिंघण (दुसरा), महादेवराय, रामदेवराय यांचा काळ हा सुवर्णकाळ होता. त्यांनी द्वारसमुद्रचा राजा होयसळापर्यंत यादव साम्राज्याच्या मोहिमा काढल्या. यादवांच्या काळातच संत नामदेव, श्री चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, मुकुंदराज, संत गोरोबा, संत चोखोबा, संत सावता महाराज, संत जनाबाई इत्यादी संत-महंत होऊन गेले. चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ लिहिणारा हेमाद्री पंडित हा यादवांच्या दरबारातच होता. किंबहुना अखेरच्या यादव राजांवर त्याचा प्रचंड प्रभाव होता.