

Petrol Diesel Price Hike India
esakal
सुनील चावके - ‘सकाळ’च्या नवी दिल्ली ब्युरोचे प्रमुख
एकीकडे पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांना सामोरे जातानाच आर्थिक परिस्थिती सावरण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे उभे ठाकले आहे. त्याला तोंड देण्यासाठी सरकारला सज्ज व्हावे लागेलच, त्याबरोबर संकटाला तोंड देण्याची नागरिकांनाही मानसिक आणि आर्थिक तयारी करावी लागेल.
अमेरिका-इस्राईल-इराण युद्धामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभाग नसतानाही भारताला त्याचे चटके सहन करावे लागणार, हे तीन आठवड्यांतच स्पष्ट झाले आहे. भारतात सर्वसामान्यांना त्याचे परिणाम मे महिन्यात जाणवण्याची शक्यता आहे. तीव्र उन्हाळा आणि त्यात दाहक युद्धझळा अशा परिस्थितीला सामोरे जावे लागेल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर आता ११० डॉलरच्या आसपास आणि भारताच्या कच्च्या तेलाच्या बास्केटचे दर १३५-१४६ डॉलरच्या घरात पोहोचले असले तरी पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीच्या विधानसभा निवडणुकांमुळे इच्छा नसतानाही मोदी सरकारला २९ एप्रिलपर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला लगाम घालावा लागणार आहे. तोपर्यंत युद्ध थांबले नाही तर हा सव्वा महिन्याचा कालखंड म्हणजेच ‘अच्छे दिन’ असे म्हणण्याची वेळ येऊ शकते.