

Iran-US Conflict 2026
esakal
गोपाळ कुलकर्णी- sarkarnama@esakal.com
पश्चिम आशियात पुन्हा एकदा करबलाची युद्धभूमी अवतरलीये, फरक एवढाच आहे की ती आता इराकमध्ये नाही तर इराणमध्ये आहे. इमाम हुसैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेलं बलिदान आजही जगभरातील तमाम शिया मुस्लिमांना लढण्याचा संदेश देतं. अली खामेनेई यांच्यासारखं सर्वोच्च धार्मिक नेतृत्व संपवून देखील अमेरिका आणि इस्राईल या बलाढ्य देशांना इराणला शरण आणता आलेलं नाही. एकीकडं मोसादसारखी क्रूर आणि तितकीच बलवान गुप्तचर संघटना आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेकडून शक्तिशाली शस्त्रांचा आधार मिळून देखील इराणचा पाडाव होताना दिसत नाही. कालपरवापर्यंत जी मंडळी खामेनेई यांच्या धार्मिक राजवटीविरोधात रस्त्यावर उतरली होती तीच आता स्वराष्ट्रासाठी परचक्राच्याविरोधात उभी ठाकली आहेत. तेलासाठी पेटलेला हा संघर्ष आता धर्मयुद्ध झाला आहे. खामेनेई यांच्या ‘शहादत’नं हजारो शियांना बंदुका हातात घेऊन लढण्यासाठी प्रवृत्त केलंय.
अली खामेनेई यांच्या पश्चात आता इराणचं नेतृत्व हे त्यांचे पुत्र मोज्तबा खामेनेई यांच्याकडं आलंय. शिया जगतामध्ये ‘शॅडो प्रिन्स’ म्हणून ओळखले जाणारे मोज्तबा या युद्धात जखमी झाले तरी देखील त्यांनी आपली तलवार म्यान करण्यास नकार दिला. धार्मिक बाबींचे जाणकार असलेले मोज्तबा हे मानसशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यांनी युद्धाचा दुसरा अंक सुरू केला. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डनं इराणभोवती एक अभेद्य आयर्न डोम उभा केला आहे. इथं एक योद्धा संपला की त्याच्या बलिदानातून शेकडोजण पुढं येतात. लोकशाही मूल्ये वगैरेंचा दावा करणाऱ्या अमेरिकेनं इराणामध्ये असंतोषाची बीजे पेरून स्वत:च्याच पायावर दगड पाडून घेतला. या युद्धामध्ये इराण कदाचित पराभूत होईल पण ज्यांनी हे युद्ध त्याच्यावर लादलं ते इस्राईल आणि अमेरिका मात्र विजयी होणार नाहीत. या युद्धाच्या राखेतून एक नवी जागतिक व्यवस्था आकाराला येऊ शकते. एक वेगळं जग जन्म घेऊ पाहतंय फक्त ते अणुशक्तीच्या पोटातून बाहेर पडू नये, हीच सर्वांचीच इच्छा असेल. कारण त्या स्फोटानंतर मानव जातीला स्वतःचे अस्तित्व टिकविण्याची दुसरी संधी कदाचित मिळणार नाही. या युद्धाचे जगावर नेमके काय परिणाम होतील, हे समजायला आणखी थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल.