

Madman Theory Trump
esakal
जगाने विसाव्या शतकातील महायुद्धानंतर दमदाटीऐवजी संयुक्त राष्ट्रांच्या शिस्त लावणाऱ्या नियमांना महत्त्व दिले. मात्र मोठ्या सत्तांनीच नियम धाब्यावर बसवल्यावर जग अस्थिरतेच्या काळात लोटले जाण्याचा धोका संभवतो. इतिहास सांगतो, की दडपशाहीवर आधारलेली ‘गनबोट डिप्लोमसी’ केवळ प्रतिकार निर्माण करते आणि संघर्ष लांबवते. आज थेट ताकदच वापरण्याकडे महासत्तांचा वाढता कल आहे, त्यामुळे मुत्सद्देगिरी अधिक हिंसक आणि थेट झाली आहे. मुत्सद्देगिरी बॉम्बच्या भाषेत बोलू लागल्यावर शब्दांकडे परतणे कठीण होते. अमेरिका-इराण युद्धात याचाच प्रत्यय येत आहे...
खाडीत युद्धाचा वणवा पेटला आहे. निष्पाप मुलांसह शेकडो लोकांचा बळी गेला आहे. या शोकांतिकेत पुन्हा एकदा जखमी झाली आहे मुत्सद्देगिरीची नैतिकता, अर्थात राष्ट्रीय हित साधताना अपेक्षित सत्यनिष्ठा, पारदर्शकता आणि न्याय यांच्या मर्यादा. इराणबरोबर वाटाघाटींदरम्यान मुत्सद्देगिरीचे दरवाजे बंद होण्याआधीच अमेरिका आणि इस्राईलने इराणवर क्षेपणास्त्रांचा मारा सुरू केला. जून २०२५मध्ये देखील इराणशी अणुकरारावरील चर्चा सुरू असतानाच अमेरिका-इस्राईलच्या ‘१२ दिवसांच्या युद्धा’त इराणच्या अणुस्थळांवर, लष्करी पायाभूत सुविधांवर आणि नेतृत्वावर हल्ले करण्यात आले. रशियानेही युक्रेनमध्ये संवादाची तयारी दाखवत रणधुमाळी सुरू ठेवण्याचा हाच डावपेच वापरला आहे. दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त भागात तसेच तैवान सभोवताली युद्धनौका तैनात करून चीन फिलिपिन्स, व्हिएतनाम व अन्य देशांवर लष्करी दबाव आणतच असतो. आधी ठोकून काढायचे आणि मग चर्चेला बसवायचे हाच नवा शिरस्ता होत आहे. याला कधी काळी ‘गनबोट डिप्लोमसी’ म्हणत. लष्करी ताकदीच्या जोरावर अटी लादायची ही क्लृप्ती आता आधुनिक रूपात अवतरली आहे.