

Umarti illegal arms
esakal
महाराष्ट्र- मध्य प्रदेश सीमेवर उमर्टी हे बेकायदा शस्त्रनिर्मितीसाठी बदनाम झालेलं छोटेसं खेडेवजा गाव. जळगावमार्गे छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे-मुंबईसह देशातील मोठ्या शहरांत येथील पिस्तुलांचा पुरवठा होतो. सातपुड्यातील पर्वतराजीतल्या अत्यंत दुर्गम अशा या खेड्यामधून देशभर गावठी कट्ट्यांचा पुरवठा कसा होऊ शकतो, हा प्रश्न स्वाभाविक आहे. पण, वंशपरंपरेनं लढवय्या जमात म्हणून लौकिक असलेल्या सिक्कलगर समाजातील काही कुटुंबंच्या कुटुंबं या व्यवसायात आहेत, किंबहुना परंपरेनं त्यात ओढली आहेत. मुळातच उपेक्षित अशा या समाजाची स्वातंत्र्यपूर्व व नंतरच्या काळात आणि आजही उपेक्षाच होत आहे. पुनर्वसन किंवा उद्योग-व्यवसायाला प्रोत्साहनाच्या योजनाही त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत.