
सहकारी शेतीसारख्या विविध प्रयोगांतून संघटनेकरिता मनोभूमी तयार करताना आमची एक घोषणा असायची, की ‘कमानेवाला खायेगा, लुटनेवाला जायेगा, नया जमाना आयेगा.’ ‘नया जमाना’ प्रत्यक्षात आणता येतो, हे कलिंगडाची लागवड करून साऱ्यांना कळलं. जे जमीनमालक कलिंगडाची शेती करून श्रीमंत व्हायचे, त्यांना काम करायला मजूर मिळेनासे झाले. मालकांच्या जमिनी मजुरांनी कसण्याकरिता घेतल्या. म्हणजे ज्या मालकांकडे आदिवासी वेठबिगार होता, त्याच मालकांच्या जमिनी त्यानं भाड्यावर कसायला घेतल्या, हे फार मोठं परिवर्तन होतं.
वेठबिगार मुक्त झाल्यानंतर आजूबाजूच्या गावांमध्येही संघटनेचं स्फुल्लिंग चेतवलं जात होतं. संघटनेचं वेड आजूबाजूच्या गावांमध्ये एखाद्या गंधासारखं वाऱ्यावर वाहून नेत पसरत होतं. भिवंडी, वाडा या तालुक्यांतील आसपासची बरीचशी गावं संघटनेत आली होती. आदिवासी संघटित होऊ लागले होते. आतापर्यंत हा समाज अचेतन, निद्रिस्त होता. त्यांच्या मेंदूतून कोणतीही स्वप्नं डोळ्यात पाझरत नव्हती. नशिबावर भरवसा टाकून आपल्या कर्माची फळं मानून परिस्थितीला शरण जात आदिवासी जगत होता.