
शिबिराचे अनेक सकारात्मक परिणाम लोकांच्या प्रत्यक्ष जीवनात होऊ लागले होते. गावोगावी आदिवासींवरील अन्यायाविरोधात लढत असताना आपण एकटे नाही, ही भावना शिबिरातल्या आदानप्रदानातूनच दृढ होई. गावात अन्याय करणारा मोठा गट किंवा मोठी प्रशासकीय यंत्रणा यांच्यासमोर भलेही आपण संख्येने नगण्य असू; परंतु ‘संघटना’ म्हणून आपली ताकद मोठी आहे, हे शिबिरात दृढ होई.
घटना बांधणी होत असताना लोकांचं शिक्षण हाही एक अविभाज्य भाग होता. शिबिर असो, गावातली साधी बैठक असो, जाहीर सभा असो, आपसातलं बोलणं असो माहितीचं आदानप्रदान करीत आम्हीही शिकत होतो आणि आदिवासीही. शिबिरात ‘विज्ञान’ या विषयाला विलक्षण प्रतिसाद होता. आमच्या असं लक्षात आलं, की आदिवासींचा भूगोल मात्र खूपच कच्चा आहे.
आपलं गाव, फार फार तर तालुका इथपर्यंत त्यांची मजल होती. अनेक जणांना जिल्हा म्हणजे काय, हेही माहीत नव्हतं. राज्य आणि देश माहीत असण्याचा तर प्रश्नच नव्हता. शिबिरात त्यांना जगाचा नकाशा दाखवला, पृथ्वीचा गोल दाखवला, पृथ्वीवर पाणी आणि जमीन किती आहे याची माहिती वेगवेगळ्या पद्धतींनी दिली.