
निरक्षर आदिवासी महिला ज्या पिढ्यान् पिढ्या गुलामीत होत्या, त्या आज ‘संविधानाविषयी’ बोलू लागल्या होत्या. आजवर मालकाचा, पोलिसाचा मार खाणारा आदिवासी ‘संविधान माहितीय का?’ असा खडा सवाल पोलिसांना करू लागला होता, एवढी हिंमत त्यांच्यात आली होती. पोलिस स्टेशनला जाऊन झगडून त्यांचा हक्क ते घेऊ लागले होते. कारवीच्या जीर्ण झोपडीत राहणारा, दिवसभर राबणारा, पेज पिऊन झोपणारा कष्टकरी आदिवासी, त्याला संविधानाने दिलेल्या अधिकारांवर आता निर्भीडपणे बोलू लागला होता, हे माझ्यासाठी समाधानाचं होतं...
संघटनेची प्रशिक्षण शिबिरं सुरूच होती. संघटनेचं वेड लागलेल्यांना शिबिराकरिता प्राधान्य द्यायचं ठरलं. भिवंडी तालुक्यातल्या विश्वभारती फाट्यावर राहणारा बाळाराम भोईर हा असाच एक वेडापीर. वय अवघं चौदा-पंधरा वर्षं; परंतु त्या कोवळ्या वयातच त्याला संघटनेचं वेड लागलं होतं. गावात जेव्हा संघटनेची गाणी म्हटली जायची तेव्हा लपून छपून तो ती ऐकून शिकला. शाळेतही तीच गाणी म्हणायला लागला. हे गावच्या सरपंचांच्या कानावर गेलं.