Gangaram Gawankar
Esakal
अरुण घाडीगावकर
आपल्या एकूण तीन नाटकांचे हजारांहून अधिक प्रयोग पाहण्याचं भाग्य ‘वस्त्रहरणकार’ गंगाराम गवाणकर यांच्या नशिबी आलं. केवळ नाटकच नव्हे; तर चित्रपटांसाठी कथा, पटकथा, संवाद आणि दूरदर्शन मालिका त्यांनी लिहिल्या. स्तंभलेखनही केलं. त्यांच्या लेखनासाठी अनेक महत्त्वाचे पुरस्कार लाभले. नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळही त्यांच्या गळ्यात पडली; पण एवढ्या साऱ्या सन्मानापेक्षा त्यांना चाहत्यांच्या, जवळच्या लोकांच्या गराड्यात राहून ‘आनंद’ साजरा करण्यात अधिक ‘रस’ होता.
वस्त्रहरणकार’ गंगाराम गवाणकर ३०-४० दिवस दुर्धर आजाराशी निकराने झुंज देत होते. ही झुंज दुर्दैवाने अपयशी ठरली आणि २७ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा ती दुःखद बातमी आली... ‘गवाणकर गेले.’ दहा-पंधरा दिवस ‘गवाणकर यांची प्रकृती चिंताजनक’ अशा बातम्या येतच होत्या. त्यांना आराम पडावा, या आजारातून ते बाहेर पडावेत म्हणून त्यांचे हितचिंतक प्रार्थनाही करत होते. ते कोमात गेले तेव्हाच त्यांना भेटून यावं, असं प्रकर्षाने वाटत होतं; पण राहून गेलं. जे त्यांना भेटून यायचे त्यांच्याकडून मला त्यांच्या तब्येतीविषयी कळायचं. प्रदीप कबरे, संजय डहाळे हे सातत्याने त्यांना जाऊन पाहत असत.
काही रंगकर्मींनी त्यांचे रुग्णालयातील फोटो शेअर केल्यानंतर त्यांची वास्तवता लक्षात आली. खरं सांगायचं तर डोळे मिटून निपचित पडलेले गवाणकर आमच्या कल्पनेपलीकडचे होते. सतत माणसांमध्ये राहणारे, मैफल जमवून गजाल्या सांगत भवतालच्या लोकांना हसत ठेवणारे, चैतन्यशील, सदा टवटवीत, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे गवाणकर असे पडून राहिलेले पाहणं कल्पनातीत होतं.