

Life of a Social Worker
esakal
आमच्या प्रवासाची खरी सुरुवात आंदोलनांपासून झाली. आम्ही रस्त्यावर उतरलो, अन्यायाविरोधात आवाज उठवला आणि अनेक वेळा पोलिसांचा लाठीमार सहन केला. अटक झाली; पण आम्ही मागे हटण्याचा विचार केला नाही. कारण आम्हाला खात्री होती, की आमचा लढा योग्य आहे.
कार्यकर्त्याचं आयुष्य हे केवळ राजकारणापुरतं मर्यादित नसतं; तर ते संघर्ष, जिद्द, अपमान, वेदना, आशा आणि जनतेच्या अपार विश्वासावर उभं राहिलेलं असतं. आम्ही जे काही आहोत, ते आमच्या कार्यकर्त्यांमुळे, सहकारी मित्रांमुळे आहोत... त्या शेतकऱ्यामुळे जो उन्हात-वाऱ्यात आपलं आयुष्य जाळतो, त्या शेतमजुरामुळे जो रोजंदारीसाठी लढतो, त्या दिव्यांग बांधवांमुळे जे आपल्या मर्यादांशी झगडत जगतात, त्या महिला भगिनींमुळे ज्या घर आणि समाज दोन्ही सांभाळतात अन् त्या युवकांमुळे ज्यांच्या डोळ्यांत स्वप्नं आहेत; पण त्यांना दिशा देणाऱ्या संधींचा अभाव आहे. आमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा संघर्षाचा होता. त्या संघर्षानेच आम्हाला घडवलं. आम्ही कधीच सोपं आयुष्य निवडलं नाही; कारण आम्हाला माहीत होतं, की सोप्या मार्गावर चालणाऱ्यांना जनतेचं दु:ख समजत नाही. आम्ही कठीण मार्ग निवडला; कारण त्या मार्गावरच खऱ्या आयुष्याची ओळख होते. आमच्या आयुष्यात अनेक वेळा असे प्रसंग आले, की जिथे आम्ही सहजपणे मागे फिरू शकलो असतो; पण प्रत्येक वेळी आम्ही स्वतःला एकच प्रश्न विचारला - ‘जर आपणच मागे फिरलो, तर या लोकांसाठी कोण उभं राहणार?’ आणि त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पुन्हा उभं करत राहिलं. म्हणूनच आमचा प्रवास हा वैयक्तिक नाही; तर तो जनतेच्या विश्वासाचा प्रवास आहे.