

डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये अपेक्षित निर्णयांऐवजी जागतिक समीकरणे बदलणाऱ्या निर्णयांची मालिका सुरू आहे. सद्यःस्थितीमध्ये भारताला चीनशी संघर्ष नको आहे आणि चीनही भारताबरोबरील संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करत आहे. एकूणच, ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे दोन्ही देश परस्परांमधील संबंध सुधारण्यावर भर देतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतरच्या दोन महिन्यांच्या काळात जागतिक राजकारणाची समीकरणे बदलणाऱ्या अनेक घटना घडत आहेत. विशेषतः, अमेरिकेच्या पारंपरिक परराष्ट्र धोरणामध्येच ट्रम्प बदल घडवून आणत आहेत. यामुळे अमेरिकेचे जुने मित्र कमालीचे नाराज झाले आहेत, तर आजवर अमेरिकेचे हाडवैर असणारे देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांसोबत ट्रम्प यांनी घरोबा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ही राष्ट्रे अमेरिकेशी सहकार्याची भूमिका घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आपल्या पहिल्या कार्यकाळात स्वतः ट्रम्प यांनी टार्गेट केलेल्या देशांशीच आज ते जुळवून घेताना दिसत आहेत.