narendra dabholkar family
Esakal
जी. डी. पारेख
saptarang@esakal.com
लोकविलक्षण दाभोलकर कुटुंबाची कथा विस्तृतपणे सांगणारे ‘१५५ सदाशिव पेठ, सातारा’ हे पुस्तक वाचताना ‘माझ्या दहा मुलांपैकी एकही दुसऱ्यासारखे नाही आणि कोणतेही माणसासारखे नाही’ (म्हणजे सामान्य माणसासारखे नाही) हे दाभोलकर भावंडांच्या आई व कुटुंबप्रमुख माई यांचे विधान किती तंतोतंत व खरे आहे, याचा प्रत्यय सातत्याने येतो.
‘सिस्टिम मोडणे, दुरुस्त करणे किंवा एकीच्या जागी दुसरी आणणे या तीनही पद्धतीपेक्षा सुखी ठरणारी चौथी पद्धत म्हणजे ‘विड्रॉ फ्रॉम द सीस्टिम’ या विश्वासाने वाटचाल करणारे श्रीपाद ऊर्फ मुकुंद दाभोलकर, आयुष्याच्या प्रवासात मार्क्स आणि केन्स यांच्यापेक्षा फ्रॉईडच अधिक खरा असतो किंवा हे दोघेही हवे असतात फ्रॉईडसाठी किंवा ‘सारे असून, सारे नसून जगण्यामध्ये ब्रम्हानंद’ असे मानणारे दत्तप्रसाद दाभोलकर, ‘काम करताना निखळ आनंद वाटावयास हवा, तरच आणि तोपर्यंतच कामात राहा’ असे कार्यकर्त्यांना सांगणारे नरेंद्र दाभोलकर, ‘या देशात खरेखुरे गोसंवर्धन करायचे असेल तर गाई कापणे अगत्याचे आहे’ असे आपले मत बिनधोकपणे व्यक्त करणारे चारुदत दाभोलकर... अशा प्रकारे स्वानुभावावरून मनावर ठसलेले आगळे-वेगळे असे जीवनाचे तत्त्वज्ञान आयुष्यभर बाळगून यशस्वी वाटचाल करणारी दाभोलकर कुटुंबीय आपणास येथे भेटतात. देहदानापासून इच्छामरणापर्यंतची तरतूद करणारी दाभोलकर मंडळी ही नेहमीच काळाच्या पुढचा विचार करताना दिसून येतात.