

National Film Awards
esakal
कोणत्याही पुरस्कार प्रक्रियेची विश्वासार्हता ही नेहमीच त्यांच्या परीक्षक मंडळाच्या बौद्धिक, सौंदर्यदृष्टी आणि प्रामाणिकतेच्या पातळीवर ठरते. हे निकष पाहता राष्ट्रीय पुरस्कारांचे विविध वर्षांतील परीक्षक कोणत्या रकान्यात बसवता येतील, असा प्रश्नच अडूर गोपाळकृष्णन यांनी विचारला आहे.
अडूर गोपालकृष्णन हे काही उगाचच काहीतरी बोलून सतत चर्चाकेंद्री राहणारे किंवा राहू इच्छिणारे व्यक्तित्व नाही. त्यामुळे जेव्हा केव्हा ते जाहीररीत्या काही सांगतात, टिप्पणी करतात तेव्हा ते महत्त्वाचे ठरते. मल्याळम चित्रपटसृष्टीतील ‘नव्या प्रवाहा’चे प्रणेते असलेले अडूर गोपालकृष्णन हे आता आपल्या वयाच्या ८४व्या वर्षी नवा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. या प्रस्तावित सिनेमाच्या निमित्ताने माध्यमांसोबत बोलताना गोपालकृष्णन यांनी केंद्र सरकारच्या वतीने सिनेमांना देण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय पुरस्कारां’वर थेट टीका केली. ‘गेल्या काही वर्षांत सर्वात वाईट दर्जाच्या सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून, या पुरस्कारांची निवड करणारे परीक्षक मंडळदेखील निम्न दर्जाचे आहे. त्यामुळे हे पुरस्कार देणे बंद केले तरी हरकत नाही’ असे अत्यंत टोकदार मत त्यांनी मांडले. आपल्या सिनेमांसाठी देश-विदेशातील बहुतांश देशांचे आणि त्याच वेळेला महत्त्वाच्या बहुतांश जागतिक सिनेमहोत्सवांतील सर्वोच्च पुरस्कार पटकावणाऱ्या दिग्दर्शकाला आपल्याच देशातील राष्ट्रीय पुरस्कारांबाबत असे आणि एवढ्या टोकाचे मत का मांडावेसे वाटले असेल?