

Voter Awareness and Democracy
esakal
सर्वसामान्य नागरिकांना सत्तेच्या खेळातला केवळ ‘प्रेक्षक’ मानले जात असेल, तर लोकांनीच जागरूक आणि सक्रिय झाले पाहिजे. आपण ‘कर्ते’ आहोत, याची जाणीवजागृती आज गरजेची आहे.
सांप्रतकाळातील लोकशाहीचे चित्र आक्रसले गेले असून ‘सत्तेसाठी सत्ता’ या उद्दिष्टाभोवती केंद्रित झालेले मूठभरांचे राजकारण हे त्याचे एक व्यवच्छेदक लक्षण बनले आहे. त्यामुळे मतदारांचे ‘राजेपण’ हे औटघटकेचे ठरते आहे. ते हिरावून घेणारी व्यवस्था त्याला कायमच रांगेत उभी करू पाहते. मग तीच रांग कधी यात्रांची असते, तर कधी जत्रांची असते. कधी त्याला संसारोपयोगी साहित्याचे आमिष दाखविले जाते, तर कधी पैठणीवाटपासाठी मेळे भरविले जातात. मतदानाच्या एक दिवस आधी गल्लीबोळात होणारे ‘लक्ष्मीदर्शन’ ही तर आता नित्याची बाब झाली आहे. अशा रीतीने मतदारांचे `राजेपण’ मतदानापुरतेच सीमित केले, की सत्ताखेळ खेळण्यास आपण मोकळे, असाच बहुधा सर्व राजकीय पक्षांच्या धुरिणांनी समज करून घेतलेला दिसतो. त्यामुळे आता तडजोडी करणे, समीकरणे जुळवणे, अन्य पक्षातील कार्यकर्त्यांना घाऊकपणे प्रवेश देणे, नकोश्यांना बाहेर काढणे, कधी पक्षच्या पक्ष फोडणे तर कधी दुसऱ्या पक्षातील काही बड्या नेत्यांना आयात करणे, अशा बहुरंगी खेळात ते मग्न आहेत. त्यातील ‘खेळाडूं’नी मतदारांना केवळ ‘प्रेक्षक’ ठरवले आहे.