
मेरिकन गुंतवणूकदार आणि परोपकारी वृत्ती असणारे वॉरेन बफे जगातील सर्वात प्रसिद्ध गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. गुंतवणूक क्षेत्रात नावलौकिक होण्याआधी त्यांनी त्यातील अनेक घटनांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. बफे यांनी ‘द इंटेलिजेंट इन्व्हेस्टर’चे लेखक बेंजामिन ग्रॅहम यांच्यासाठी काम केले. न्यूयॉर्कमधील ग्रॅहम-न्यूमन या गुंतवणूक संबंधित सेवा देणाऱ्या कंपनीत ग्रॅहम यांच्याकडे त्यांनी विश्लेषक म्हणून नोकरीही केली होती. त्या वेळेस गुंतवणूक संबंधित विविध पैलूंचा अभ्यास करताना त्यांनी अनुभवलेले अनेक प्रसंग आणि घटना सोप्या शब्दांत टिपून ठेवल्या. भविष्यात त्याचा उपयोग इतरांना गुंतवणूक समुपदेशन करताना झाला. आज त्यांच्या गुंतवणूकविषयक विचारांचा वारसा जगभरातील गुंतवणूकदार पुढे चालवत आहेत.
बफे यांनी आतापर्यंत गुंतवणूकविषयक अनेक मार्गदर्शक विचार आणि तत्त्वे मांडली आहेत. त्याचसोबत गुंतवणूक आणि जीवन अशा दोन्ही बाबतींत व्यावहारिक, सामान्य ज्ञान अन् अंतर्दृष्टी यातील परस्पर संबंधदेखील उलगडून दाखविला आहे. त्याबाबत सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी बफे यांचे गुंतवणूकविषयक निवडक कोट्स (सुविचार) विश्लेषण स्वरूपात पाहणे गरजेचे आहे.