

Whale Fall Ecosystem
esakal
डॉ. नीलिमा कुलकर्णी - sakal.avtaran@gmail.com
देवमाशाचा मृत्यू हा समुद्रतळावरील असंख्य जीवांसाठी नव्या जीवनाची सुरुवात ठरतो. त्याचे कलेवर समुद्राच्या तळाशी पोहोचल्यानंतर अनेक दशके विविध सजीवांना अन्न आणि आश्रय पुरवते. मृत्यूतून जीवन फुलवणाऱ्या या अद्भुत नैसर्गिक घटनेला म्हणतात ‘व्हेल फॉल’!
सर्व सजीवांचा मृत्यू अटळ असतो. सर्व सजीव अखेरीस मरण पावतात, अगदी देवमासेसुद्धा. पण या शांत स्वभावाच्या महाकाय सस्तन प्राण्यांचे मृत्यूनंतर काय होते, असा प्रश्न पडतो. कधी कधी त्यांचे मृतदेह किनाऱ्यावर वाहून येतात; पण अधिक सामान्यपणे दिसणाऱ्या परिणामाला ‘व्हेल फॉल’ म्हणतात, ज्यात देवमाशाचे शरीर अक्षरशः समुद्राच्या तळाशी कोसळते. ‘व्हेल फॉल’ हे खोल समुद्रातील मृतभक्षी आणि इतर प्रजातींसाठी मोठ्या अनपेक्षित मिळणाऱ्या बक्षिसाप्रमाणे असते. कारण अन्न मिळवणे कठीण असलेल्या या समुद्रतळाच्या परिसंस्थेत ‘व्हेल फॉल’च्या माध्यमातून अन्नाचा एक महत्त्वाचा आणि दीर्घकाळ टिकणारा स्रोत मिळतो.
‘व्हेल फॉल’ ही समुद्रातील एक अद्भुत आणि महत्त्वाची नैसर्गिक घटना असते. मृत देवमाशाचे कलेवर समुद्राच्या तळाशी कोसळणे आणि त्यानंतर तळाशी निर्माण होणारी एक खास परिसंस्थाच असते जणू! देवमाशाच्या मृत्यूनंतर त्याचा देह जेव्हा समुद्राच्या तळाशी हजारो फूट खाली जाऊन स्थिरावतो तेव्हा अनेक गोष्टी घडतात. व्हेलच्या तळाशी जाण्याच्या याच क्रियेला ‘व्हेल फॉल’ असे म्हणतात. जेव्हा व्हेलचा मृत्यू होतो तेव्हा प्रथम शरीराच्या कडा कुजू लागतात. या प्रक्रियेत वायू निर्माण झाल्यामुळे काही काळ तो मृतदेह तरंगतो. क्वचित शार्क किंवा समुद्रपक्षी त्यावर गुजराण करताना दिसतात. त्यानंतर मात्र शरीर हळूहळू समुद्रतळाशी जाऊन पोचते. नैसर्गिक ‘व्हेल फॉल’ फार कमी प्रमाणात दिसून येतात. व्हेलच्या शरीरात भरपूर प्रमाणात चरबीचा साठा असल्यामुळे देहाचे विघटन होण्यास वेळ लागतो. पाण्याच्या स्तंभाच्या भौतिक दाबामुळेसुद्धा ही विघटनाची प्रक्रिया थोडीफार मंदावते. तसे पाहता एका देवमाशाचा मृत्यू अगणित जीवांना अन्न पुरवून जगण्याची ताकद देतो. ही क्रिया ३०-४० वर्षे सुरू राहते. म्हणजेच एका देवमाशाचा मृत्यू हजारो जीवांना अनेक दशके स्थिर अन्न उपलब्ध करून देऊन आयुष्य देतो. ‘व्हेल फॉल’मुळे समुद्राच्या तळाशी असलेल्या परिसंस्थेला अन्नाचा दीर्घकाळ टिकणारा स्रोत उपलब्ध होतो. अर्थात अशा प्रकारे मृत्यूनंतर व्हेल तळाशी जाऊन पडण्याचे प्रसंग दुर्मिळ असतात. बरेचदा व्हेलच्या स्थलांतर मार्गावर ‘व्हेल फॉल’ दिसतात.