coronavirus : पुण्यात अशा पद्धतीने मिळणार रेशनवरचे धान्य

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी रेशन दुकानावर आता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून धान्याचे वितरण करताना लाभार्थ्यांची बायोमेट्रिक पडताळणी होणार नाही.

पुणे : कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी रेशन दुकानावर आता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून धान्याचे वितरण करताना लाभार्थ्यांची बायोमेट्रिक पडताळणी होणार नाही. त्याऐवजी रेशन दुकानदारांनी स्वतःचे आधार प्रमाणित करून धान्य उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत.

राज्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी अन्न व पुरवठा विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना संसर्ग होऊ नये, यासाठी रास्तभाव दुकानातून धान्याची वितरण करताना रेशनकार्ड धारकांची बायोमेट्रिक पडताळणी ई- पॉस मशीनवर करण्यात येत होती. रेशन दुकानदार यांनी स्वतःचे आधार कार्ड प्रमाणित करून धान्य वाटप करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे लाभार्थ्यांना ई- पॉस मशीनवर अंगठा लावण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच रेशन दुकानावर गर्दी होणार नाही, याचीही खबरदारी रेशन दुकानदारांनी घ्यावी. त्यासाठी टोकन देऊन लाभार्थ्यांना नियोजित वेळेत दुकानावर येण्याच्या सूचना द्याव्यात. धान्य घेण्यासाठी आलेले लाभार्थी योग्य अंतर ठेवून रांगेत उभे राहतील, याचीही खबरदारी रेशन दुकानदारांनी घ्यावी, अशा सूचना अन्न व पुरवठा विभागाने दिले आहेत. 

coronavirus : अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना पोलिसांकडून मिळणार पास

सामाजिक कल्याणकारी संस्थांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे या संस्थांना गोदामातून देण्यात येणारे धान्य वितरित करताना संबंधितांनी साबणाने हात स्वच्छ करून ई-पॉस मशीन हाताळण्याची काळजी घ्यावी. तसेच या सुविधेमुळे लाभार्थ्यांना धान्य वाटप करताना धान्याचा अपहार होणार नाही, याचीही दक्षता रेशन दुकानदारांनी घ्यावी. वाटप केलेल्या धरण्याची जबाबदारी रेशन दुकानावर दारावर राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ई-पॉस मशीनमध्ये आरसी क्रमांक टाकल्यानंतर लाभार्थी व्यक्तीचे नाव न येता आधार कार्ड क्रमांक येईल. त्यानंतर ई-पॉस मशीनवर लाभार्थ्याच्या अंगठ्याचा ठसा न घेता रेशन दुकानदार स्वतःच्या अंगठ्याचा ठसा देऊन लाभार्थ्यांना धान्य वितरित करावे. 
- गणेश डांगी, अध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना, पुणे शहर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus pune biometric distribution system not required for rationing