चाकण - मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान, ता. ३० रोजी चाकणमध्ये झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी गेल्या तीन दिवसांपासून धरपकडसत्र सुरू केले आहे. रात्री, अपरात्री तरुणांना पोलिस पकडून नेत आहेत. सध्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तपास करत आहे. तरुणांची उचलबांगडी पोलिसांनी सुरू केल्याने बहुतांश तरुण गाव सोडून पळाले आहेत. ज्यांना पोलिस ठाण्यात आणले आहे त्यांचे नातेवाईक, विशेषतः महिला पोलिस ठाण्यात ठाण मांडून आहेत.

चाकणच्या हिंसाचारात बाहेरील तरुणांबरोबर स्थानिक तरुणांचाही सहभाग आहे, असे पोलिसांचे मत आहे. मराठा समाजातर्फे मात्र बाहेरील तरुणांनी हा प्रकार केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पोलिसांनी चाकण, कडाचीवाडी, नाणेकरवाडी, रासे, भोसे, मेदनकरवाडी, काळूस, खालुंब्रे गावांतील तरुणांची धरपकड सुरू केली आहे. जे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळतात, ज्यांच्या हातात काठ्या, दगड आहेत.
त्यांच्यावर कारवाई केली जात आहे; पण काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असे ही आहेत ते फुटेजमध्ये न येता जमावात येऊन त्यांनी जाळपोळ, तोडफोड केली आहे. नाणेकरवाडीत अनेक गुन्हेगारांच्या टोळ्या आहेत. नाणेकरवाडीत टोळीयुद्धातून एकावर खुनी हल्ला ही दोन वर्षांपूर्वी झाला होता. त्यातील आरोपी स्थानिक होते. तेथील काही गुन्हेगारांचे काही पोलिस अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते गुन्हेगार काही पोलिस अधिकाऱ्यांना त्यांची नावे सांगून त्यात गोवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप नाणेकरवाडी ग्रामस्थ, महिलांनी केला आहे.
केवळ गावपुढारी काही गुन्हेगार सांगतात म्हणून संबंधित तरुणांवर कारवाई नको, असे नाणेकरवाडी येथील ग्रामस्थ, महिला यांचे म्हणणे आहे. आमच्या मुलांना विनाकारण गोवण्यात आले, आम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखवा, अशी मागणी नाणेकरवाडीचे पोलिस पाटील राजू नाणेकर, सामाजिक कार्यकर्ते अरुण जाधव; तसेच महिलांनी केली आहे.
धन्यकुमार गोडसेंनी सूत्रे स्वीकारली
हिंसाचारात जखमी झालेल्या पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी आज पोलिस ठाण्यात सूत्रे स्वीकारली. येत्या नऊ ऑगस्टला होणारा बंद सुरळीत पाडण्यासाठी योग्य नियोजन करणार असून, त्यासाठी गावचे सरपंच, पोलिस पाटील व पोलिस अधिकारी, पोलिस यांची संयुक्त बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंसाचारात जे सहभागी झाले आहेत, ज्यांचे सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ क्लिप हाती लागल्या आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार आहे. कोण प्रत्यक्षात सहभागी आहे, कोणी जाणूनबुजून त्याला गोवण्याचा प्रयत्न केला आहे का, या सर्व बाबी ९ ऑगस्टनंतर पडताळून पाहून त्यांची निश्चित सुटका केली जाईल.
- संदीप पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक