#MarathaKrantiMorcha आरक्षणाचा लढा अद्याप सुरूच

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 August 2018

टिळेकरांच्या कार्यालयासमोर आंदोलन
गोकुळनगर - मराठा समाजाला आरक्षण भाजपचेच सरकार देईल, असा ठाम विश्वास आमदार योगेश टिळेकर यांनी आंदोलनकर्त्यांना दिला.

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी सकाळी आमदार योगेश टिळेकर यांच्या कोंढवा येथील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. 

टिळेकरांच्या कार्यालयासमोर आंदोलन
गोकुळनगर - मराठा समाजाला आरक्षण भाजपचेच सरकार देईल, असा ठाम विश्वास आमदार योगेश टिळेकर यांनी आंदोलनकर्त्यांना दिला.

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी सकाळी आमदार योगेश टिळेकर यांच्या कोंढवा येथील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. 

मोर्चाच्या वतीने आमदार टिळेकर यांना निवेदन दिण्यात आले. त्यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. निवेदनात मराठा समाजाला आरक्षण, अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम तरतुदीचा होणारा गैरवापर थांबवावा व कायद्यात योग्य ती दुरुस्ती करावी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती व शेतीमालास हमीभाव मिळावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, मराठ्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण व मराठा समाजाच्या महामानवांची बदनामी थांबवावी, अशा प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

मार्केट यार्ड बाजार गुरुवारी बंद
पुणे - आरक्षणासाठी मराठा समाजाने गुरुवारी (ता. ९ ) पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात मार्केट यार्डातील आडतदार, हमाल आदी सहभागी होणार आहेत. या दिवशी संपूर्ण बाजार बंद ठेवण्याचा निर्णय संबंधित संघटनांनी घेतला आहे. 

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशन, छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य जनरल कामगार युनियन, महात्मा फुले कामगार संघटना, टेम्पो पंचायत आदी संघटनांनी बंदचे आवाहन केले आहे. या आंदोलनासंदर्भात या संघटनांची संयुक्त बैठक सोमवारी पार पडली. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी पुन्हा एकदा बाजार बंद ठेवण्याचा निणय बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती असोसिएशनचे सचिव रोहन उरसळ यांनी कळविली आहे. बैठकीस असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, कामगार युनियचे सचिव संतोष नांगरे, गणेश घुले, युवराज काची, राजेंद्र कोरपे, अमोल चव्हाण, विलास थोपटे, सूर्यकांत चिंचवले आदी उपस्थित होते.

मुंढवा परिसरात दुचाकी रॅली
मुंढवा - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह अन्य मागण्यांसाठी मुंढवा-केशवनगरमध्ये सोमवारी बंद पाळण्यात आला. तसेच परिसरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. यात सुमारे सहाशेहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला.  

अखिल मुंढवा-केशवनगर मराठा समाजाच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले. तरुणांनी हातात भगवे झेंडे घेऊन घोषणा देत रॅलीत सहभाग घेतला. बधे वस्तीपासून रॅलीला सुरवात झाली.  हडपसर रेल्वे स्टेशन, संभाजी चौक, मुंढवा गावठाण, गांधी चौक, महात्मा फुले चौक, केशवनगर शिवाजी चौक, पवार वस्ती, मांजरी रोडवरून लोणकर वस्ती, झेड कॉर्नर मार्गे परत मुंढवा कुस्ती मैदान येथे येऊन तेथे बैठक घेण्यात आली. मराठा समाजाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मोर्चाचे वादळ सुरूच राहील, असे मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी सांगितले. मोर्चासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #MarathaKrantiMorcha maratha reservation agitation