इन्स्टाग्रामवर ओळख, प्रेम अन्‌ धोका!

मनोज साखरे
रविवार, 29 सप्टेंबर 2019

पुण्यातील शिक्षिकेचे लैंगिक शोषण, शहरातील तरुणाविरुद्ध गुन्हा
 

औरंगाबाद - सोशल मीडियाचा वापर जेवढा चांगला तेवढा घातकही ठरू शकतो. सजगता हरवून बसल्यानंतर नुकसान होऊ शकते. असाच प्रत्यय पुण्यातील एका शिक्षिकेला आला. तिची इन्स्टाग्रामवर एका तरुणाशी ओळख झाली. विषय लग्नापर्यंत गेला; पण त्याने लग्न करण्याऐवजी भलतेच केले आणि मग ठाण्यात जाण्याची वेळ आली.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार पुण्यातील 26 वर्षीय शिक्षिकेचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट आहे. तिला फेब्रुवारीमध्ये सतीश भगवानराव घोरपडे (रा. नागेश्वरवाडी औरंगाबाद, मूळ रा. परभणी) याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. ती तिने ऍक्‍सेप्ट केली. यानंतर आपसांत परिचय झाला. तिने त्याची चौकशी केली त्यावेळी आपण मूळ परभणीतील असून, औरंगाबादेत स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असल्याचे सांगितले. केवळ फ्रेंडशिप करायची, असे सांगून त्याने शिक्षिकेला मोबाईल क्रमांक मागितला. शिक्षिकेने मोबाईल व व्हॉट्‌सऍप क्रमांक दिला.

त्यातून दोघांमध्ये संवाद वाढत गेला. कालांतराने तरुणाने शिक्षिकेसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. शिक्षिकेनेही त्याला लग्नासाठी होकार दिला. एप्रिल 2019 मध्ये ती त्याला भेटण्यासाठी औरंगाबादेत आली. रात्री साडेनऊच्या वेळी तो तिला घ्यायला मध्यवर्ती बसस्थानकात गेला. तेथून दोघेही नागेश्वरवाडी भागात तो राहत असलेल्या फ्लॅटवर गेले. शारीरिक संबंधाला तिचा विरोध असताना त्याने तिचे शोषण केले. दुसऱ्या दिवशी शहरात फिरवले. त्यानंतर रात्री साडेअकराच्या बसने दोघे पुण्याला गेले. त्यावेळी शिक्षिकेच्या घरीही दोघांत शारीरिक संबंध झाले.

येथे बिनसले
काही दिवसांनी पुन्हा तो पुणे येथे शिक्षिकेच्या घरी गेला. नवीन मोबाईलसाठी त्याने तिला पैशांची मागणी केली. यावरून वाद सुरू होताच सोसायटीत बदनामी नको म्हणून ती शांत बसली. तो वारंवार पैशाची मागणी करून बदनामीची धमकी देत असल्याने तिला नाईलाजास्तव त्याला सुमारे 60 हजार रुपये द्यावे लागले.

हे ऐकून तरुणीला धक्का
तो व्हॉटसऍपवर तिला अश्‍लिल संदेश पाठवित होता. जुलै महिन्यात त्याने तिला पुण्यातील मित्राच्या रूमवर बोलावून शोषण केले. बदनामीची धमकीही दिली. यानंतर चित्रपट पाहायला नेल्यानंतर त्याने आपला एका तरुणीशी विवाह ठरल्याचे तिला सांगितले. तिने जाब विचारल्यानंतर मात्र त्याने तिला शिवीगाळ व मारहाण केली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher raped in pune aurangabad