अहो फडणवीस, इथे दुकानेही दुपारी बंद असतात!

अमित गोळवलकर
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

शहर पुणे. भर दुपारची वेळ. तळपतं ऊन. तरीही पक्षाच्या नेत्यांना आशा होती. सभेला आत्ता गर्दी होईल, मग होईल याची वाट हे नेते पहात होते. महापालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वीची ही तशी शेवटचीच महत्त्वाची सभा. ती सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांची. ती सुद्धा पक्षाच्या बालेकिल्ल्यात. 

शहर पुणे. भर दुपारची वेळ. तळपतं ऊन. तरीही पक्षाच्या नेत्यांना आशा होती. सभेला आत्ता गर्दी होईल, मग होईल याची वाट हे नेते पहात होते. महापालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वीची ही तशी शेवटचीच महत्त्वाची सभा. ती सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांची. ती सुद्धा पक्षाच्या बालेकिल्ल्यात. 

आला मुख्यमंत्र्यांचा काॅन्व्हाॅयही आला. नेत्यांच्या चेहेऱ्यावरची चिंता आणखीनच वाढली. कारण समोर पाच हजार खुर्च्या मांडलेल्या. व्यासपीठावर काहीजण किल्ला लढवताहेत. काही जण सावलीत थांबलेल्या कार्यकर्त्यांना खुर्च्यांवर जाऊन बसायला सांगताहेत. काही जण शहरातल्या इच्छुकांना कार्यकर्ते घेऊन येण्याची, गर्दी जमवण्याची 'विनंती' करताहेत. पण गर्दी होत नाहीये. 

कुठूनतरी पत्रकारांच्या कानावर येते की मुख्यमंत्री सभास्थानावर येऊन परत गेले. मग पक्षाच्या नेत्यांकडे विचारणा सुरु होते. 'येताहेत येताहेत...थोड्याच वेळात मुख्यमंत्री येताहेत.' ही उत्तरं देत नेते पत्रकारांची तोंडे चुकवताहेत. पोलिसही जवळच असलेल्या वाहनांच्या ताफ्याकडे बोट दाखवून मुख्यमंत्री आतच आहेत, येतील थोड्या वेळात बाहेर असं सांगत वेळ मारुन नेताहेत. 

आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांचं ट्वीट येऊन आदळतं. 'समन्वयासंदर्भात काहीतरी गडबड झाल्यानं मी पुण्याची सभा रद्द केली आहे. मी पिंपरीच्या सभेसाठी रवाना होत आहे. झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी.' क्षणार्धात प्रमुख कार्यकर्त्यांना आणि पत्रकारांना काय झाले आहे, याची जाणीव होते. तिकडे व्यासपीठावरून पालकमंत्री कपाळावरुन खाली ओघळणारा घाम टिपत किल्ला लढवतातच आहेत. पण किती वेळ कार्यकर्त्यांची फसवणूक करणार. अखेर सभा आटोपती घ्यावीच लागते. 

पुण्यात आज मुख्यमंत्र्यांच्या होऊ न शकलेल्या सभेची ही क्षणचित्रे. पुण्यात आणि तेही भर दुपारी दोन वाजता मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा भारतीय जनता पक्षाने आयोजित केली होती. एकतर उन्हाच्या झळा वाढायला लागल्या आहेत. अशा भर उन्हात लोक मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकायला येतील का याची शंका सुरुवातीपासूनच उपस्थित केली जात होती आणि झालेही तसेच. नागरिकांनी सभेकडे पाठ फिरवलीच. 

या सभेसाठी पेठांमधल्या आणि जवळपासच्या प्रभागांमधल्या पक्षाच्या उमेदवारांनी गर्दी जमवणे अपेक्षित होते. काही जणांनी आपल्या परीने कार्यकर्ते आणलेही. पण त्याने पाच हजार खुर्च्या भरणे शक्यच नव्हते. शेवटी ते कार्यकर्ते म्हणजे कोण? पुणेकरच ना? अहो जिथे दुकानेही दुपारी बंद असतात, तिथे भर उन्हात टोपीखाली कांदा ठेऊन का होईना, सभेला जाणार कोण? 

आणि ज्या ठिकाणी सभा आयोजली होती, तो भागच मुळी सदाशिव, शनिवार, नारायण अशा खास पुणेरी पेठांच्या जवळचा. मते तुम्हालाच देऊ, पण दुपारी सभेबिबेला यायला सांगू नका, असा चिडका अनुनासिक सूर इथल्या कुठल्या घरातून उमटलाच नसेल? जवळच असलेली नदी ओलांडली की येतो डेक्कन जिमखान्याचा परिसर. तिथूनही गर्दी जमवणे म्हणजे आनंदच. हां, हीच सभा आजच्या शनिवारच्या दिवशी सायंकाळी साडेपाच नंतर असती तर न्यू इंग्लिश स्कूलच्या परिसरात नक्कीच ट्रॅफिक जाम झाला असता. या सगळ्या परिसरातून 'पेड आॅडियन्स' मिळवणंही अवघड. 

या परिसराने पुण्यात दोन आमदार (त्यातील एक पालकमंत्री) दिले. पुण्याचे शहराध्यक्षही याच परिसरातले. त्यांनाही इथली मानसिकता समजू नये? का आपल्या मतदारांना या सर्वांनी गृहित धरलं आहे? एकतर जवळपास सगळ्याच पक्षांना सभांना गर्दी जमवणं अवघड होत चाललंय. कारण दूरचित्रवाणी वाहिन्यांवर हे राजकीय नेते जे काही बोलतात, त्यापेक्षा फारसे वेगळे काही कानांवर पडत नाही. त्यातच टळटळीत दुपारी सभा घेतली तर मग गर्दीची अपेक्षाही धरणे चूक.

खरंतर आता पुणे बदललय...त्यामुळे 'दुपारी बंद'चा टिंगलीचा सूर सोडून दिला तरीही भर दुपारी जाहीर सभा ठेवणे हा शहाणपणा होता काय, हा खरा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करुन आपण सभा रद्द केल्याचं जाहीरपणे सांगत या नेत्यांना जागेवरच 'बक्षिस' दिलंय. आता केवळ मुख्यमंत्र्यांची वेळ मिळाली म्हणून त्यांना सभेला बोलवायचे आणि गर्दी नाही म्हणून परत जायला लावायचे, याची किंमत कोण कशी मोजणार हे पाहण्यासाठी काही दिवस वाट पहावी लागेल.

Web Title: CM Devendra Fadnavis Pune Municipal corporation elections Girish Bapat Amit Golwalkar