Vidhansabha 2019 : छगन भुजबळांपुढे युतीचा चक्रव्यूह 

महेंद्र महाजन 
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

राजकीयदृष्ट्या 'व्हायब्रंट' अशी ओळख नाशिकची राहिली आहे. शहरी भागात भाजप, तर ग्रामीण भागात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे. दुसरीकडे कॉंग्रेसचे संघटन खिळखिळे झालेले असताना, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा किल्ला "आर्मस्ट्रॉंग' छगन भुजबळ लढवताहेत. स्वाभाविकपणे दोन्हीही कॉंग्रेसची मदार त्यांच्यावर असली तरीही त्यांच्यापुढे भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या युतीच्या चक्रव्यूहाचे कडवे आव्हान असेल. 

राजकीयदृष्ट्या 'व्हायब्रंट' अशी ओळख नाशिकची राहिली आहे. शहरी भागात भाजप, तर ग्रामीण भागात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे. दुसरीकडे काँग्रेसचे संघटन खिळखिळे झालेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचा किल्ला "आर्मस्ट्रॉंग' छगन भुजबळ लढवताहेत. स्वाभाविकपणे दोन्हीही काँग्रेसची मदार त्यांच्यावर असली तरीही त्यांच्यापुढे भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या युतीच्या चक्रव्यूहाचे कडवे आव्हान असेल. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये स्वतंत्र समीकरण नाशिकच्या राजकारणात राहिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेतही मागील विधानसभा निवडणुकीत पंधरापैकी चार जागा राष्ट्रवादीने अन्‌ दोन जागा काँग्रेसने जिंकल्या. मनसेचे इंजिन सुसाट धावलेल्या नाशिकमधील तीनसह चार जागा भाजपने, तर चार जागा शिवसेनेने पटकावल्या. एक जागा मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने मिळवली. 

पक्षांतराची सुरवात लोकसभा निवडणुकीपासून झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश करत दिंडोरीमधून खासदारकीला गवसणी घातली. त्यांनी "शिवबंधन'मधून मुक्त होत राष्ट्रवादी "जॉईन' केलेले दिंडोरीचे माजी आमदार धनराज महालेंचा पराभव केला. डॉ. पवार यांच्याकडून भाजपच्या विशेषतः कळवण-सुरगाणा, तर महाले यांच्याकडून राष्ट्रवादीच्या दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघाबाबत अपेक्षा उंचावल्यात. दोन्ही काँग्रेसमधील "आउट गोईंग' सुरू होताच, भुजबळांसह इगतपुरीच्या काँग्रेस आमदार निर्मला गावीत आणि बागलाणमधील राष्ट्रवादीच्या आमदार दीपिका चव्हाण यांची नावे चर्चेत आली. तिघांनी त्याबद्दल खरमरीत शब्दांत उत्तर देत चर्चेवर पडदा पाडला. 

समस्यांचे मोहळ 
दुष्काळातील होरपळ, महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी, औद्योगिक मंदी, बेरोजगारी, प्रक्रिया उद्योगांची आस, केंद्र व राज्य सरकारने नव्याने दिलेले सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम, पर्यटन विकासाचा अभाव, रखडलेला विकास हे मुद्दे राजकीय फडामध्ये अग्रस्थानी राहतील. 

सत्तांतरानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतले, परंतु भाजपला चमकदार कामगिरी करून दाखवता आलेली नाही. भाजपमध्ये कुरबुरी वाढल्या. भाजप-शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांतून विस्तव जात नव्हता; पण आता शिवसेनेला "मातोश्री'चा आदेश मानावा लागतो. 

आघाडी-युतीतर्फे आपसांत दावे 
आघाडी आणि युतीमध्ये जागा वाटपांबद्दल चर्चा सुरू असताना दोन्ही स्तरांवरून बदलेल्या राजकीय परिस्थितीत जागांमध्ये आदला-बदलाचे दावे ठोकण्यास सुरवात झाली आहे. काँग्रेसने पंधरापैकी पाचऐवजी सात जागांवर आग्रह धरण्याची भूमिका स्पष्ट केलीय. नांदगावच्या राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसने दावा ठोकला. या जागेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही आहे. शिवाय इगतपुरी, मालेगाव मध्य, नाशिक पूर्व आणि मध्य, सिन्नर या जागांसह चांदवडवर काँग्रेसने लक्ष केंद्रित केले आहे. लोकसभा निवडणुकीत युतीविरुद्ध बंडखोरी करणारे ऍड. माणिकराव कोकटे यांनी सिन्नरची राजकीय भूमिका जाहीर केलेली नाही. त्याच वेळेस शिवसेनेने नाशिक पश्‍चिम, परंपरागत नांदगावचा आग्रह ठेवत भाजपवर दबाव वाढवला. दुसरीकडे भाजपचा कळवण-सुरगाणा, नांदगाव, इगतपुरीचा आग्रह राहण्याची शक्‍यता आहे. शिवाय भाजपमध्ये बागलाण, चांदवड, नाशिक पूर्व, पश्‍चिम, मध्यमधून इच्छुकांची संख्या मोठी आहे. 

'राष्ट्रवादी'तही नाही आलबेल 
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फारशी आलबेल स्थिती नाही. छगन भुजबळांसाठी आग्रह धरणारे माणिकराव शिंदे यांनी उमेदवारीची इच्छा प्रदर्शित केली आहे. येवल्यातून शिवसेनेत उमेदवारीसाठी भाऊगर्दी आहे. भुजबळांचे पुत्र पंकज यांच्याविरोधात नांदगावमधून स्वकीयांचा नाराजीचा सूर आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे नांदगाव, सिन्नर, देवळाली, नाशिक मध्य, मालेगाव मध्यमधून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली. राज्यमंत्री भुसे यांच्याविरोधात उमेदवार कोण? एवढा प्रश्‍न सद्यःस्थितीत उरला आहे. जिल्ह्याच्या राजकारणातील हिरे घराण्यातील डॉ. अपूर्व हिरे यांनी नाशिक पश्‍चिममधून "राष्ट्रवादी'कडून तयारी सुरू केली असली, तरीही त्यांचे बंधू अद्वय हिरे यांनी लढण्याबद्दलचे पत्ते उघडलेले नाहीत. दिंडोरी-पेठमधून माजी आमदार रामदास चारोस्कर यांचा शिवसेनेकडे कल आहे. कळवणमधून खासदार डॉ. पवार यांचे थोरले दीर नितीन आणि जाऊबाई जयश्री यांची तयारी सुरू असली, तरीही त्यांचा कल अखेरच्या क्षणी महत्त्वाचा ठरेल. त्यांची लढत माकपचे आमदार जे. पी. गावीत यांच्याशी असेल. देवळालीतून भाजपच्या, तर नाशिक पूर्वमधून शिवसेनेच्या इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू आहे. शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांचे चुलत बंधू यतीन हे निफाडमधून तयारीला लागलेत. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader chhagan bhujbal in confusion because of shivsena and bjp alliance

टॅग्स