#SaathChal आळंदी-पंढरपूर मार्गावर सायकलने प्रबोधन वारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

इंदापूर - एचआयव्ही ग्रस्त रुग्ण, विधवा माता यांना त्यांचे हक्क, मूलभूत सुविधा मिळाव्यात तसेच पर्यावरण संतुलनाचा संदेश देत परभणी येथील होमिओपॅथीक ॲकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीजचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक तसेच त्यांचे सहकारी आकाश गिते हे सायकलवरून आळंदी, पुणे, पंढरपूर ते कुर्डूवाडी अशी वारी करत आहेत. 

इंदापूर - एचआयव्ही ग्रस्त रुग्ण, विधवा माता यांना त्यांचे हक्क, मूलभूत सुविधा मिळाव्यात तसेच पर्यावरण संतुलनाचा संदेश देत परभणी येथील होमिओपॅथीक ॲकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीजचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक तसेच त्यांचे सहकारी आकाश गिते हे सायकलवरून आळंदी, पुणे, पंढरपूर ते कुर्डूवाडी अशी वारी करत आहेत. 

डॉ. चांडक यांची ही सहावी वारी आहे. भारतातील सात राज्यांत सायकलीवरून ४० हजार किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या डॉ. चांडक यांचे इंदापूर येथे इंदापूर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष भरत शहा तसेच गिते यांचा नगर परिषद काँग्रेस गटनेते कैलास कदम, सामाजिक कार्यकर्ते रमेश धोत्रे व जावेद शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी नितीन मखरे, योगेश गुंडेकर, इरफान शेख, जमीर शेख, मुसा मुलाणी, देवराज देशमुख, विजय शेवाळे, श्रीकांत गायकवाड, अख्तर शेख उपस्थित होते.

डॉ. चांडक हे लातूरजवळील शेगाव, हासेगाव परिसरात रवी बापटले यांच्यासमवेत १३० एड्‌स बाधित युवकांचा सांभाळ करत आहेत. १८ वर्षांवरील युवकांना त्यांनी स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली, तर ३० विधवा मातांना त्यांनी विविध उद्योगाच्या मार्फत आत्मनिर्भर केले आहे.

त्यांच्या मूलभूत हक्कासाठी ते जागरूक आहेत. समाजाने त्यांना समजून घ्यावे तसेच युवापिढी एड्‌सला बळी पडू नये म्हणून त्यांचे प्रयत्न आहेत. मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी ते सायकल चालविण्याचा संदेश देत आहेत. शुक्रवारी देहूवरून ज्ञानेश्वर माउलीचे दर्शन घेऊन डॉ. चांडक व गिते यांनी सायकलवरून प्रवास करत प्रबोधनास सुरवात केली. पुणे, खराडी, हडपसर, उरूळी कांचन, यवत, चौफुला, पाटस, भिगवण, पळसदेव येथे समाजप्रबोधन करून ते १४ जुलै रोजी इंदापूरला आले. येथे जनजागृती करून ते अकलूज, वेळापूर मार्गे पंढरपूरला निघाले आहेत. पंढरपूर येथील एचआयव्ही बाधित पालवी प्रकल्पास भेट देणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal Palkhi wari Alandi Pandharpur Route Cycle Awakening