१ लाख किलो  झेंडू बाजारात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

पुणे - खंडेनवमी आणि दसऱ्याच्या दिवशी मानाचे स्थान असलेल्या झेंडू या फुलाची सुमारे एक लाख किलो (१०० टन) इतकी आवक बुधवारी झाली. साधारणपणे चांगल्या प्रतीच्या फुलाला प्रति किलोला ४० ते ६० रुपये इतका भाव मिळाला. 

पुणे - खंडेनवमी आणि दसऱ्याच्या दिवशी मानाचे स्थान असलेल्या झेंडू या फुलाची सुमारे एक लाख किलो (१०० टन) इतकी आवक बुधवारी झाली. साधारणपणे चांगल्या प्रतीच्या फुलाला प्रति किलोला ४० ते ६० रुपये इतका भाव मिळाला. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दसऱ्याच्या आदल्या दिवशी चांगली आवक झाली आहे. गणपती ते दिवाळीपर्यंत झेंडूच्या फुलाला मागणी असते. विशेषत: नवरात्रीमध्ये खंडेनवमी, दसऱ्याच्या दिवशी या फुलाची मागणी प्रंचड वाढते. या वर्षीच्या हंगामात झेंडूला कमी भाव मिळाला असला, तरी उत्पादकांचे नुकसान झाले नाही, असा दावा व्यापारी सागर भोसले यांनी केला. गणपती, त्या पाठोपाठ नवरात्रात झेंडूला अपेक्षित भाव मिळाला आहे. परंतु तो गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. आवक चांगली झाली आहे. साधारणपणे शंभर टन इतकी आवक झाली आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व भागांतून ही आवक झाली आहे. दसरा, खंडेनवमी या दिवशी तोरण, हार करण्यासाठी तसेच पूजेसाठी झेंडूला मागणी असते. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवसानंतर शेतकऱ्यांनी माल कमी प्रमाणात पाठविला आणि तो राखून ठेवला होता. त्यामुळे बुधवारी आवक वाढली होती.

शेवंतीच्या फुलालाही मागणी
झेंडू पाठोपाठ शेवंतीच्या फुलालाही मागणी असते. तिला साधारणपणे ५० ते १५० रुपये प्रति किलो तर गुलछडीला १२० ते १८० रुपये इतका भाव मिळाला. पूजेसाठी आपट्याची पाने, तोरणाकरिता आंब्याची पाने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विक्रीला आणली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 million kg in the marigold market