दहा प्रश्‍नांचे पर्याय "सीईटी'मध्ये चुकीचे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

पुणे - राज्याच्या सामाईक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) भौतिकशास्त्र आणि गणित विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेत एकूण दहा प्रश्‍नांचे पर्याय चुकीचे दिले गेल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे 200 गुणांपैकी 11 गुणांविषयी विद्यार्थ्यांच्या मनात साशंकता निर्माण झाली आहे. भौतिकशास्त्र विषयाच्या पेपरची काठीण्य पातळीसुद्धा "जेईई-मेन' परीक्षेसारखी होती, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

गणिताच्या "व्हर्जन 11' प्रश्‍नपत्रिकेतील 39 क्रमांकाच्या प्रश्‍नासाठी "के व्हॅल्यू' देण्यात आलेली नव्हती. या प्रश्‍नासाठी दोन गुण आहेत. तसेच भौतिकशास्त्र विषयाच्या "व्हर्जन 11' प्रश्‍नपत्रिकेतील 14, 15, 28, 33, 39, 40, 41, 42 आणि 43 क्रमांकाच्या प्रश्‍नांसाठी चुकीचे पर्याय देण्यात आले आहेत. प्रश्‍न क्रमांक 14 मध्ये डेटा अचूक दिला गेला नव्हता, 15, 28 व 33 व्या प्रश्‍नामध्ये पर्याय चुकीचे दिले गेले, 39 व्या प्रश्‍नाची मांडणी चुकीची होती आणि 40 व्या प्रश्‍नामध्ये "युनिट्‌स' व "नंबर ऑफ टर्न' दिले नव्हते. 41, 42 व 43 व्या प्रश्‍नांचीही मांडणी चुकली होती, अशी माहिती खासगी क्‍लासचालक संदीप देवधर यांनी दिली.

भौतिकशास्त्राचा पेपर सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप वेळ लागला. बहुतांश विद्यार्थ्यांचे प्रत्येकी एक गुण असलेले असे किमान पाच प्रश्‍न अनुत्तरीत राहिले आहेत, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. रसायनशास्त्र विषयाचा पेपर खूप सोपा असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: 10 question option wrong in cet exam

टॅग्स