लॅाकडाउननं मारलं पण मास्कनं मात्र तारलं...

संदीप जगदाळे
शनिवार, 27 जून 2020

कोरोनामुळे रोजगार हिरावला म्हणून कुरकुरत बसण्यात काय अर्थ हा विचार करून हडपसर येथील महिलांनी एकत्र येऊन कोरोनामुळेच निर्माण झालेल्या संधीचा लाभ घेत बेरोजगारीवर मात केली.

हडपसर (पुणे) : कोरोनामुळे रोजगार हिरावला म्हणून कुरकुरत बसण्यात काय अर्थ हा विचार करून हडपसर येथील महिलांनी एकत्र येऊन कोरोनामुळेच निर्माण झालेल्या संधीचा लाभ घेत बेरोजगारीवर मात केली. सध्या बाजारपेठेत मास्कला मागणी वाढली असल्याने त्यांनी गेल्या तीन महिन्यापासून मास्क तयार करण्याचे काम सुरू केले आहे. अात्तापर्यंत १० हजार मास्क त्यांनी विकले आहेत.

डाॅक्टर दांपत्याचे तीस वर्षात हजारपेक्षा जास्त ट्रेक 

मास्कची गुणवत्ता चांगली असल्याने अजून १५ हजार मास्कची त्यांना नवीन आॅडर मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा बेरोजगारीचा प्रश्न मिटला असून अडचणीच्या काळात त्यांना घर खर्चाला मदत होत आहे. 
सामाजिक कार्यकर्ते तुषार बिनवडे यांनी या महिलांना मास्क तयार करण्यासाठी शिलाई मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. तर महिलांनी युट्युबच्या माध्यमातून मास्क कसे तयार करायचे याचा अभ्यास केला व त्यापध्दतीने मास्क तयार करण्याचे काम सुरू झाले.

अशी सुरू ठेवता येतील सलून आणि ब्यूटी पार्लर

गेल्या तीन महिन्यापासून या महिला मास्क तयार करत आहेत. महिलांनी तयार कलेल्या मास्कचे मार्केटींग बिनवडे व मानवी युवा संस्थेचे दिंगबर माने करत असल्यामुळे महिलांना मास्क विक्रीचा प्रश्न सुटला आहे. 
कविता काकडे म्हणाल्या, मी लोकांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करत होते. कोरोना आल्यानंतर मला माझ्या मालकांनी कामाला येऊ नये असे सांगितले. त्यामुळे माझ्या पायाखालची वाळू सरकली. डोळ्यातून अश्रू आले. घर कसे चालवायचे या चिंतने मला ग्रासले. मात्र, मास्कचे काम हाताला मिळाल्यामुळे माझ्या घरखर्चाचा प्रश्न मिटला.

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अश्विनी बोरकर म्हणाल्या, मी मॅालमध्ये कामाला होते. कोरोना आल्यानंतर माझे काम गेले. अचानक उद्भवलेल्या प्रश्नामुळे घर कसे चालवायेच असा प्रश्न पडला. मात्र लॅाकडाउनने मारले पण मास्कने तारले याची मला अनुभूती आली. पंचनशिला चंदनशिवे म्हणाल्या, मी शिलाई काम करत होते. मात्र, कोरोनामुळे ग्राहकांनी पाठ फिरवली. त्यातच पतीची हृदयाची शस्त्रक्रीया झाली. त्यामुळे पती कामावर जाऊ शकत नव्हते. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही मैत्रिणी एकत्र आलो आणी मास्क तयार करण्याच्या कामातून आम्हाला चांगल्या प्रकारे पैसे उपल्बध होउ लागले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

शैला होले म्हणाल्या, मी मुलांची शिकवणी घेत होते. मात्र कोरोनामुळे विद्यार्थी शिकवणीला येत नाहीत. तसेच लॅाकडाउनमुळे पतीचा रिक्षा व्यवसाय कमी झाला. त्यामुळे घर खर्च कसा चालवायचा हा प्रश्न निर्माण झाला. घरातील पाच माणसांच्या रोजच्या रोजीरोटीचा प्रश्न कसा सोडवायचा याची मला चिंता लागली होती. मात्र मास्कच्या व्यवसायामुळे आमचा प्रश्न सुटण्यास मदत झाली. कोरोना संक्रमणाचा सामना समाजातील सर्वच घटकांना करावा लागत आहे. या काळात अनेकांचे रोजगार गेले असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, कोरोना संकटाची संधी प्रत्येकाने शोधायला हवी याचा प्रत्यय मला स्वअनुभवातून आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10,000 masks made by women in Hadapsar