मराठी आणि सेमी  इंग्लिश मध्यमांसाठी दहावी अभ्यासक्रम 'दररोज सकाळ' मध्ये

मराठी आणि सेमी इंग्लिश मध्यमांसाठी दहावी अभ्यासक्रम 'दररोज सकाळ' मध्ये

प्रत्येक पेपरला एक किंवा दोन दिवसांची सुट्टी आहे. या सुट्टीच्या कालावधीत परीक्षेच्या वेळी नेमका काय अभ्यास करायचा, काय वाचायचे, कशाची उजळणी करायची याचं नियोजन आताच या दोन महिन्यांत करून ठेवा.

इयत्ता दहावीची परीक्षा एक मार्चपासून सुरू होत आहे. परीक्षा जवळ येत चालली तसतसा आपला उत्साह, आपली उत्सुकता वाढत जाते. या परीक्षेत उत्तम यश मिळवायचे असेल तर हे उरलेले साठ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. उज्ज्वल यशासाठी बुद्धिमत्ता कमी लागते. त्यासाठी हवेत कष्ट, प्रयत्न आणि अभ्यास. हेही परीक्षा पद्धत समजून घेऊन करणे आवश्यक आहे. प्रस्तुत लेखात प्रामुख्याने आपण परीक्षा पद्धत समजून घेणार आहोत. प्रथम परीक्षेचे वेळापत्रक अभ्यासा.

- डॉ. अ. ल. देशमुख

वेळापत्रकाचा अभ्यास केल्यास जाणवते, की तुम्ही सर्वजण किती भाग्यवान आहात! प्रत्येक पेपरला एक किंवा दोन दिवसांची सुट्टी आहे. या सुट्टीच्या कालावधीत परीक्षेच्या वेळी नेमका काय अभ्यास करायचा, काय वाचायचे, कशाची उजळणी करायची याचं नियोजन आताच या दोन महिन्यांत करून ठेवा.

ध्येय निश्चिती

मित्रांनो, इयत्ता दहावीमध्ये आता नुसतं पास होऊन चालत नाही. अगदी ४०-४५ टक्के गुण मिळवूनसुद्धा भागत नाही. आता लागतात कमीत कमी ६० टक्के गुण किंवा त्यापेक्षा जास्त अगदी १०० टक्क्यांपर्यंत. ६०, ७०, ८०, ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण कसे मिळवायचे ते समजून घ्या. बोर्डाच्या परीक्षेला एकूण विषय सहा आहेत. प्रत्येक विषयाला १०० म्हणजे एकूण ६०० गुण आहेत.

बोर्डाच्या मूल्यमापन पद्धतीचे दोन भाग आहेत

१) अंतर्गत मूल्यमापन, २) बहिस्थ मूल्यमापन.

अंतर्गत मूल्यमापनासाठी प्रत्येक विषयाला २० याप्रमाणे एकूण १२० गुण आहेत. अंतर्गत मूल्यमापन शाळा करते. महाराष्ट्रातील सगळे शिक्षक चांगले, प्रेमळ आहेत; ते प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विषयाला कमीत कमी १८ किंवा जास्तीत जास्त २० गुण देतात. अर्थात, हे गुण काही शिक्षकांच्या खिशात नाहीत. त्याला काही निकष आहेत ते पुढीलप्रमाणे ः

१) तुमची शाळेतील वर्षभरातील उपस्थिती २) वागणूक ३) गृहपाठ वह्या वेळेवर पूर्ण करणे ४) प्रयोगवही उत्तम लिहून त्यावर विज्ञान शिक्षक व शाळेचे मुख्याध्यापक यांची सही घेणे ५) तोंडी परीक्षा उत्तम देणे. हे सर्व निकष तुम्हाला पूर्ण करावे लागतात. तेव्हा १२० पैकी ११८, ११९, १२० गुण मिळतात. आपण हिशेबासाठी प्रत्येकाला प्रत्येक विषयात १८ मिळतील असे गृहीत धरू म्हणजे एकूण १८ x ६ = १०८ मिळाले. हे शाळेकडून मिळालेले गुण एकुणातून वजा करूया.

याचा अर्थ ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवण्यासाठी बोर्डाच्या लेखी परीक्षेत प्रत्येक विषयात कमीत कमी ४२ गुण मिळालेच पाहिजेत. ७० टक्क्यांसाठी ५२, ८० टक्क्यांसाठी ६२ आणि ९० टक्क्यांसाठी ७१ गुण मिळाले पाहिजेत. ज्याने त्याने आपल्या कुवतीनुसार, क्षमतेनुसार आपले ध्येय निश्चित करा.

ध्येय कसे साध्य करायचे?

अ) पाठ्यपुस्तकावर प्रभुत्व मिळवणे

इयत्ता दहावीची परीक्षा ही पूर्णपणे पाठ्यपुस्तकांवर आधारित आहे. सर्व विषयांच्या पाठ्यपुस्तकांचे पुन्हा एकदा सखोल वाचन करा. पुढचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे पाठ्यपुस्तकात धडा संपल्यानंतर दिलेले स्वाध्याय. मित्रांनो, दर वर्षी बोर्डाच्या प्रत्येक विषयाच्या कृतिपत्रिकेत (प्रश्नपत्रिकेत) ७० टक्के प्रश्‍न पाठ्यपुस्तकातील विचारतात. उरलेल्या दोन महिन्यांमध्ये स्वाध्याय सोडवा, त्यांची दोन-तीनदा उजळणी करा. गणिताच्या स्वाध्यायातील काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत नसतील तर ती शिक्षकांकडून किंवा आपल्याच वर्गातील हुशार विद्यार्थ्यांकडून सोडवून घ्या, समजून घ्या. फक्त स्वाध्यायावर प्रभुत्व मिळवले तरी तुम्हाला ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळणार आहेत इतकी दहावी सोपी आहे.

ब) कृतिपत्रिका समजून घ्या

प्रत्येक विषयाच्या कृतिपत्रिकेतील (प्रश्नपत्रिकेतील) प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लेखी परीक्षेत लिहायची आहेत. त्यासाठी प्रत्येक विषयातील कृतिपत्रिकेतील प्रत्येक प्रश्न, त्या प्रश्नाचे स्वरूप, त्या प्रश्नाचा अर्थ, त्या प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा, त्या प्रश्नाला असलेले गुण, त्या प्रश्नाची, प्रश्नाच्या उत्तराची व्याप्ती या सर्व गोष्टी आपल्याला समजल्या तर त्याप्रमाणे अभ्यास करता येईल, उजळणी करता येईल, उत्तरे कशी, किती लिहायची हे समजेल. परीक्षेची भीती, ताण नाहीसा होऊन परीक्षा विषयांचा आत्मविश्वास वाढेल. उत्तम यशासाठी हेच आवश्यक आहे.

क) उत्तरपत्रिकेचे विश्लेषण

शाळेत प्रथमसत्र परीक्षा झाली आहे. आता सराव परीक्षा होईल. या परीक्षांच्या शिक्षकांनी तपासलेल्या उत्तरपत्रिका मिळतील. मिळालेल्या उत्तरपत्रिकेत किती गुण मिळालेत तेवढेच फक्त आपण पाहतो व उत्तरपत्रिका ठेवून देतो किंवा टाकून देतो. इथंच आपलं चुकतं. ती उत्तरपत्रिका ठेवून देऊ नका, टाकून देऊ नका. तिचं विश्लेषण करा. तिचा बारकाईने अभ्यास करा. आपले कोणकोणते प्रश्न चुकलेत ते शोधा. कोणत्या प्रश्नाला कमी गुण मिळालेत ते अभ्यासा. पुढीलप्रमाणे तक्ताच तयार करा.

या पद्धतीमुळे आपल्याला आपल्या नेमक्या चुका समजतात व त्यामध्ये सुधारणा करता येते. पुढील परीक्षेत अधिक गुण मिळवता येतात.

ड) लेखन सराव

कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव पुरेसा झालेला नव्हता त्याचा परिणाम लेखनाच्या वेगावर झालेला आहे. त्यामुळे आजही अनेक विद्यार्थी सर्व येत होते; परंतु वेळ पुरला नाही, वेळ कमी पडला

ही तक्रार करतात. अजून दोन महिने बाकी आहेत. रोज मराठी दहा आणि इंग्रजीच्या दहा ओळी लिहिल्या तर लेखनाचा योग्य तो सराव होईल व परीक्षेत वेळेत सर्व पेपर सोडवून होईल.

इ) स्वयं-अध्ययन - स्वयं-मूल्यमापन

अनेक विद्यार्थी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये टेस्ट सिरीज लावतात. मी याचा विरोधी नाही; परंतु टेस्ट सिरीज लावण्यापेक्षा बोर्डाच्या जुन्या प्रत्येक विषयाच्या तीन-तीन प्रश्नपत्रिका घरी सोडवा. या तीनही प्रश्नपत्रिका पाठ्यपुस्तकात बघून सोडवा. जानेवारी महिन्यात या तीन प्रश्नपत्रिका

सोडवून पूर्ण करा आणि फेब्रुवारी महिन्यात दोन प्रश्नपत्रिका पाठ्यपुस्तकात न बघता वेळ लावून सोडवा. या सोडवलेल्या दोन प्रश्नपत्रिका कोणालाही तपासायला देऊ नका. त्या स्वतःच पुस्तकात बघून तपासा. उत्तरपत्रिका स्वतः तपासताना कोणत्या प्रश्नात नेमकं काय चुकलंय ते आपल्याला कळेल. यामधून

सर्वोत्तम उजळणी होईल.

अशा रीतीने बोर्डाच्या जुन्या पाच प्रश्नपत्रिका सोडवून होतील. मित्रांनो, एवढं काम तुम्ही प्रामाणिकपणे केलं तर ७० टक्क्यांच्या पेक्षा जास्त गुण निश्चितच मिळतील.

फ) वेळेचं नियोजन

परीक्षेच्या आधीचे हे दोन महिने जून ते डिसेंबरपेक्षा अत्यंत महत्त्वाचे आहेत. या काळात आपला एक मिनिटसुद्धा वायफळ

जाता उपयोगाचा नाही. त्यासाठी वेळेचे नियोजन करा. पुढील नियोजन पाहा व त्यावरून आपले ठरवा.

एकूण उपलब्ध तास २४

  • रात्रीची झोप ८ तास

  • शाळा ६ तास

  • क्लास २ तास

  • सकाळचे विधी १ तास

  • सकाळ-संध्याकाळचे जेवण १ तास

  • रिलॅक्स टाइम १ तास

  • टीव्ही/मोबाईल १ तास

  • एकूण २० तास

सर्व गोष्टी हिशेबात धरूनसुद्धा ४ तास शिल्लक राहतात.

हे चार तास प्रामाणिकपणे अभ्यास करा. एवढा अभ्याससुद्धा उत्तम यशासाठी पुरेसा आहे.

ग) आरोग्य-आहार आणि मनःस्थिती

याबाबतीत पालकांची जबाबदारी अधिक आहे. या दोन महिन्यांमध्ये आपल्या पाल्याला थोडा कमीत आहार द्या. शीतपेये, आइस्क्रीम किंवा तळलेले पदार्थ शक्यतो देऊच नयेत. आपल्या पाल्याची रात्रीची झोप

आठ तास होईल हे कटाक्षाने पाहावे. उगाच रात्री दोन-दोन वाजेपर्यंत मुलांना जागू देऊ नका. मुलांची मनःस्थिती आनंदी राहील ते पाहा. विनाकारण अभ्यासाचा अतिताण मुलगा/मुलगी घेणार नाही याकडे लक्ष

असूद्या. शक्य झाल्यास रोज दहा-पंधरा मिनिटे आपल्या पाल्याशी अभ्यासाबाबत चौकशी करा, चर्चा करा. पालकत्व म्हणून एवढ्या गोष्टी आपण केल्या तरी पुरेशा आहेत.

परीक्षेसाठी व उज्ज्वल यशासाठी सर्वांना शुभेच्छा .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com