विमानतळाबाहेर चिखल!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016

पुणे - देश-विदेशातून आलेल्या पाहुण्यांचे येथील चकाचक विमानतळातून बाहेर पडताच खड्डे आणि चिखलाने "स्वागत‘ होत आहे. महापालिका आणि हवाई दलाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने "स्मार्ट‘ पुण्याची प्रतिमा मलिन होत आहे. 

पुणे - देश-विदेशातून आलेल्या पाहुण्यांचे येथील चकाचक विमानतळातून बाहेर पडताच खड्डे आणि चिखलाने "स्वागत‘ होत आहे. महापालिका आणि हवाई दलाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने "स्मार्ट‘ पुण्याची प्रतिमा मलिन होत आहे. 

लोहगाव येथे संरक्षण विभागाचे विमानतळ आहे. मात्र, येथून दररोज 70 हून अधिक नागरी विमानांचे उड्डाण होते. हजारो प्रवासी या विमानतळावरून ये-जा करतात. येथील 509 चौक-वेकफील्ड चौक ते विमानतळ हा रस्ता; तसेच 509 चौक ते टाटा गार्डरूम दरम्यान दोन्ही रस्त्यांची पावसामुळे वाईट अवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळणी झाली आहे. दोन्ही बाजूस चिखल साठल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्याचच टाटा गार्ड रूमपर्यंतचा रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत आणखी भर पडत आहे. या कोंडीमुळे अनेकदा नागरिकांना मध्ये रस्त्यावर उतरून विमानतळाकडे चालत जावे लागते.
 

बैठका झाल्या; काम नाहीच
लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण आणि बाहेरील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासंदर्भात यापूर्वी दोन ते तीन वेळा बैठका झाल्या. मात्र त्यादृष्टीने महापालिका आणि एअरफोर्स यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. विमानतळ विस्तारीकरण व परिसराचा विकास आराखडा तयार होऊन मान्यतेसाठी गेला आहे. मात्र, बैठका आणि नियोजन यामध्ये ही दोन्ही कामे अडकली आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
 

509 ते विमानतळ दरम्यानचा रस्ता हवाई दलाच्या ताब्यात आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाची तयारी महापालिकेने दर्शविली आहे; परंतु त्यावरील केबल हटवून देण्याची जबाबदारी "एअरफोर्स ऍथॉरिटी‘ची आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही. मध्यंतरी एकत्र पाहणी केल्यानंतरही ही बाब एअरफोर्सच्या निदर्शनास आणून दिली होती.
- राजेंद्र राऊत, पथ विभागप्रमुख, महापालिका