गुहेत अडकलेल्यांना ध्यानधारणेचा फायदा - अभियंता प्रसाद कुलकर्णी

मानसी सराफ-जोशी
बुधवार, 11 जुलै 2018

पुणे - थायलंडमधील गुहेमध्ये अडकलेल्या फुटबॉल टीमची आणि त्यांच्या प्रशिक्षकांची सुटका करण्याच्या मदतकार्यात भारतातील किर्लोस्कर ब्रदर्स या कंपनीचे तांत्रिक साह्य लाभले. गुहेतून पाणी बाहेर काढण्यासाठी कंपनीने तंत्रसाह्य केले. तंत्रसाह्य आणि बचाव मोहीम याबरोबरच अडकलेल्या मुलांनी ध्यान धारणेवर भर दिल्याने त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहिल्याचे बचाव पथकातील सदस्यांनी सांगितले.

किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडची थायलंडमध्ये उपकंपनी आहे. या स्थितीचा सामना करण्यासाठी त्यांनी तंत्रज्ञान कौशल्याची मदत केली आहे. त्यांनी बॅंकॉकमध्ये आलेल्या पुरामध्येही बचावकार्यात मदत केली होती.

या बचाव पथकात मूळचे मिरजेचे असलेले प्रसाद कुलकर्णी या अभियंत्याचा समावेश होता. बचाव कार्यासाठी गेलेल्या कुलकर्णी यांच्याशी "सकाळ'ने संपर्क साधला असता, त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहिलेली परिस्थिती वर्णन केली. थाम लुआंग गुहेत बारा मुले आणि त्यांचे प्रशिक्षक दोन आठवडे अडकून पडूनही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यात ध्यानधारणेचा मोठा वाटा असल्याचे प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.

किर्लोस्कर कंपनीच्या बचाव पथकाने फ्लड पंपच्या साह्याने गुहेतील पाणी बाहेर काढले. याबाबत बोलताना, "आम्ही हे करू शकलो याचा मला आणि माझ्या सहकाऱ्यांना अभिमान वाटत आहे. आम्ही गेल्या आठवड्यापासून येथे आहोत. मुलांना बाहेर काढणे हे अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक होते,' असे कुलकर्णी यांनी सांगितले. आमच्यासाठी आणखी एक अभिमानाची बाब म्हणजे या मुलांनी त्यांच्यावर आलेल्या या अवघड प्रसंगी खचून न जाण्यासाठी त्यांनी ध्यानधारणा करण्यावर भर दिला. यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढले आणि अडचणींचा सामना करण्याची शक्ती त्यांना मिळाली. ध्यानधारणा हे भारताचे वैशिष्ट्य असल्याने आम्हाला त्यांच्या या कृतीबद्दल अभिमान वाटला, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

बचावकार्यासाठी येथे आल्याच्या दिवसापासूनच यशाबद्दल आशावादी होतो, असेही कुलकर्णी म्हणाले. बचाव कार्य सुरू असताना पाऊस आणि बिकट भौगोलिक रचनेमुळे वारंवार अडथळे येत असतानाही अत्याधुनिक तांत्रिक सामग्रीमुळे किर्लोस्कर कंपनीच्या पथकाचा बचावकार्यादरम्यान मोठा फायदा झाल्याचे प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले. कामाची निश्‍चित दिशा आणि तंत्रकुशलता यामुळे हे यश मिळाल्याचे सांगत त्यांनी हे यश किर्लोस्कर कंपनीच्या वरिष्ठांना आणि बचाव पथकातील सहकाऱ्यांना दिले. किर्लोस्कर कंपनीमध्ये डिझाइन विभागात अनेक वर्षे काम केल्यानंतर कुलकर्णी हे सध्या ते किर्लोस्करवाडी येथील कारखान्यात या विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. उपसा तंत्रज्ञानातील ते जाणकार म्हणून त्यांची ओळख आहे.

Web Title: 12 boys and football coach rescued cave meditation prasad kulkarni