आंदोलनाकडे पदाधिका-यांनी पाठ फिरवल्याची दखल घेणार अजित पवार

मिलिंद संगई
गुरुवार, 31 मे 2018

बारामती :  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यातच इंधन दरवाढीविरुध्द केलेल्या आंदोलनाकडे पदाधिका-यांनी पाठ फिरवल्याची दखल अजित पवार आपल्या बारामती भेटीत कशी घेतात या बाबत आता कार्यकर्त्यांत उत्सुकता आहे. बारामती शहर व तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने बारामतीत आयोजित आंदोलनाकडे बहुसंख्य प्रमुख पदाधिका-यांनी पाठ फिरविली. पक्षाने ज्यांना पदे दिली त्या पदाधिका-यांकडे या आंदोलनासाठी वेळच नसल्याचे चित्र दिसल्याने राष्ट्रवादीच्या गोटातही अस्वस्थता पसरली आहे.

माध्यमांनीही या घटनेची दखल घेतल्याने आता अजित पवार या बाबत काय नेमके मतप्रदर्शन करतात या कडे सर्वांचेच लक्ष आहे. अजित पवारांचे बारामती तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व आहे, मोदी लाटेत राज्यात सर्वाधिक मताधिक्याने बारामतीकरांनी त्यांना विधानसभेत पाठविले. त्यांच्या कार्यपध्दतीविषयी सामान्य माणूस समाधानी असला तरी ज्यांना पदे दिली त्यांचा जनसंपर्क पार तुटल्याने लोकांना प्रत्येक काम करुन घेण्यासाठी अजित पवारांपर्यंत जावे लागते, अशी लोकांची तक्रार आहे. 

राष्ट्रवादीची राज्याची धुरा अजित पवारांनी स्वताःच्या खांद्यावर घेतलेली असल्याने बारामतीत पदाधिका-यांनी लोकसंपर्क ठेवत कामे करावी ही त्यांची अपेक्षा असते, पण अजित पवारांची पाठ फिरल्यावर पदाधिकारी संघटनेला फारसे महत्व देत नसल्याचे अधोरेखीत झाले आहे. रविवारी (ता. 3) नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त पवार बारामतीत येत असून ते या बाबत काय भूमिका मांडणार या बाबत उत्सुकता आहे. दूध संघाच्या शरद सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली.